माहेरवाशिणीसाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून, सर्वाच्या संमतीने आणि संगतीने दोन घटका विंरगुळा देणारा करमणूकीचा सोहळा म्हणजे मंगळागौरीचा सण. श्रावणातील प्रत्येक मंगळवारची रात्र ही या मंगळागौरीच्या जागराने रंगते, रात्रभर झिम्मा, फु गडय़ा आणि उखाण्यांच्या आनंदाच्या बहरात माहेरवाशिण रंगून जाते. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या खेळाला घराच्या चार भिंतीपुरती मर्यादित न ठेवता मोठय़ा व्यासपीठावर खेळायची संधी देणारी ‘चला खेळूया मंगळागौर’ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. ४ सप्टेंबरला या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार असून त्यात राज्यभरातून आलेल्या मंडळांमधून सर्वोत्तम मंडळाची निवड केली जाईल.‘झी चोवीस तास’ वृत्तवाहिनी आणि ‘झी मराठी’ आयोजित, ‘रामबंधू टेम्पटिन’ प्रस्तुत ‘चला खेळूया मंगळागौर’ ही स्पर्धा राज्यभरात आयोजित करण्यात आली होती. डोंबिवली, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या शहरांतून ही स्पर्धा घेण्यात आली होती. तुफान प्रतिसादात रंगलेल्या या स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ सप्टेंबरला माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहात होणार आहे. ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि मेधा भागवत कार्यरत आहेत. तर अभिनेता संकर्षण क ऱ्हाडे आणि तन्वी पालव यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. महाअंतिम फे रीत राज्यभरातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम मंगळागौर खेळणाऱ्या मंडळांमध्ये चुरशीचा खेळ रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना खास पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.सारेगमप’चे गायक आणि ‘डीआयडी’शोमधील नर्तकांचे सादरीकरण हेही या महाअंतिम फेरीचे आकर्षण आहे.
महाअंतिम फेरीत रंगणाऱ्या मंगळागौरीच्या खेळासाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश मिळणार असून त्यासाठी त्यांनी ७०३८५२७२५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
‘चला खेळूया मंगळागौर’ या स्पर्धेचे प्रक्षेपण १० सप्टेंबपर्यंत दररोज संध्याकाळी ५.३० वाजता ‘झी चोवीस तास’वर दाखवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी ‘रामबंधू टेम्पटिन’, ‘पनवेलकर समूह’, ‘अभ्युदय बँक’, ‘मांडके हिअरींग सव्‍‌र्हिस’ आणि ‘मंगलाष्टक डॉट कॉम’ हे सहप्रायोजक आहेत.