लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : पूर्व उपनगरात पक्षी निरीक्षणासाठी आणि प्रभात फेरीसाठी लोकप्रिय असलेल्या भांडुप पंपिंग स्टेशन येथील कांदळवन अभयारण्यात नागरिकांचा उत्साह वाढत आहे. या ठिकाणी गेल्या महिन्यापासून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली असून महिनाभरात सुमारे एक लाख रुपये शुल्क जमा झाले आहे.

भांडुप पंपिंग स्टेशन येथील कांदळवन अभयारण्य हे पक्षी निरीक्षकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी सुमारे २३० प्रजातींचे पक्षी आढळतात. तसेच ठाणे खाडीतील फ्लेमिंगोंचे सुंदर दृश्य येथून सहज पाहता येते. या ठिकाणी सुमारे १०० हेक्टर परिसर पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. पक्षी निरीक्षकांबरोबरच प्रभात फेरीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते.

कांदळवन कक्षाच्या ताब्यात ही जागा असली तरी पूर्वी येथे सुरक्षारक्षक नसल्याने सायंकाळी मद्यपींचा वावरदेखील असायचा. या अभयारण्याचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने या ठिकाणी ऑक्टोबरपासून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. कांदळवन कक्षातर्फे ठाणे खाडीच्या दुसऱ्या बाजूस ऐरोली येथे अभ्यास केंद्र तसेच निसर्ग परिचय केंद्र आहे. मात्र भांडुपची बाजू सध्या दुर्लक्षितच होती. एक निरीक्षण मनोरा येथे आहे. गेल्या महिनाभरात शुल्क आकारणी सुरू झाल्यानंतरही पर्यटकांचा ओघ कायम असल्याने भविष्यात ही जागा आणखी विकसित होण्याची शक्यता आहे.

११९५ जणांच्या भेटी

महिनाभरात एकूण ११९५ जणांनी या अभयारण्यास भेट दिली असून छायाचित्रणासाठी १७३ जणांनी शुल्क भरले. तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठीदेखील शुल्क जमा करण्यात आले. एकूण एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपये शुल्क महिनाभरता जमा झाले.

पर्यटकांसाठी विविध योजना

या अभयारण्यातील प्रवेशावर शुल्क आकारणे इतकाच उद्देश नसून ही जागा स्वच्छ राहावी आणि तिथे संवर्धनाचे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने पूरक उपक्रम सुरू व्हावेत, अशी कांदळवन कक्षाची योजना असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळात पर्यटकांसाठी नेचर ट्रेल, निरीक्षण मनोरे, स्वच्छतागृहे अशा सुविधा येथे केल्या जातील. सध्या त्या दृष्टीने नियोजन सुरू असून लवकरच त्याची कार्यवाही सुरू होईल असे वनाधिकाऱ्यांनी नमूद केले.