आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांनी संप सुरू ठेवायचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नसून, संघटनेमध्ये कोणतीही फूट पडलेली नसल्याचे मार्डच्या पदाधिकाऱयांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य सरकारकडून अद्याप आम्हाला चर्चेचे आमंत्रण आलेले नसून, त्यांनी चर्चेसाठी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ, असेही या पदाधिकाऱयांनी सांगितले.
दरम्यान, निवासी डॉक्टरांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा नियमन (मेस्मा) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी रात्री दिले. त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांना विनावॉरंट अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच संपकरी डॉक्टरांना बडतर्फ करून सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरांची सेवा पुरवण्याचा इशाराही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला.
उच्च न्यायालयानेही संप मागे घेण्याचा डॉक्टरांना आदेश दिला आहे. डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालायाने दिले होते.