गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम जेथे झाला आहे, त्या प्रयागमध्ये घरोघरी हनुमानाची पूजा केली जाते. जगविख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने कुस्तीच्या आखाडय़ात उतरून बलोपासना करावी, मात्र हरीजींचा ओढा पहिल्यापासूनच संगीताकडे असल्याने लहानपणापासूनच त्यांनी सरस्वतीची आराधना केली, कठोर साधना केली आणि त्यातून निर्माण झाला, बासरीला नवे परिमाण देणारा एक असामान्य कलाकार!
‘लोकसत्ता’ आणि रिचा रिअल्टर्स यांची प्रस्तुती असलेल्या ‘हृदयेश फेस्टिव्हल’ची शनिवारची पहिली संध्याकाळ न्हाऊन निघाली ती पंडितजींच्या बासरीतून निघालेल्या सुरांच्या वर्षांवात. तब्बल दोन तास निर्माण झालेल्या या नादब्रह्मामुळे विलेपाल्र्यातील साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात जणू भगवान श्रीकृष्णाची मथुराच अवतरल्याची अनुभूती रसिकांनी घेतली. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कलेवरील प्रेमाने पंडितजींच्या वयावर मात केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पं. भवानीशंकर यांची पखवाजवर पडलेली कडक थाप आणि पं. विजय घाटे यांचा तबल्यावर पडलेला वजनदार हात, यापाठोपाठ पंडितजींचे वादन सुरू झाले. आपल्या मैफलीची सुरुवात करताना त्यांनी ‘झिंझोटी’ राग निवडला. हा राग तासभर तब्येतीत वाजवताना त्यांनी झिंझोटीचे सर्व रंग रसिकांना सहज उलगडून दाखवले.
मला खरं तर हाच राग रात्रभर सुरू ठेवावा, असे वाटत आहे, मात्र वेळेची मर्यादा पाळली नाही तर येथे पोलीस येतील, शिवाय पंडितजींना हा एकच राग वाजवता येतो की काय, असे तुम्हाला वाटेल. त्यामुळे आता मी किरवाणी वाजवतो, अशी मिश्किली करत पंडितजींनी किरवाणी वाजवण्यास प्रारंभ केला. विवेक सोनार या शिष्याने त्यांना बासरीवर केलेली साथ आश्वासक होती. ही मैफल संपली तेव्हा एका जगविख्यात कलाकाराचा असामान्य आविष्कार अनुभवण्यास मिळाल्याचे समाधान उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
पंडितजींच्या वादनापूर्वी या महोत्सवाच्या पूर्वार्धात पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने या महोत्सवाची सुरुवात झाली. आपली मैफल सुरू करताना शौनक यांनी मारवा हा यथोचित राग निवडला. शौनक यांनी यानंतर मिश्र कलावती रागातील ठुमरी व ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग गाऊन आपल्या मैफलीची सांगता केली.
प्रकृतीच्या कारणास्तव या मैफलीत सहभागी होऊ न शकलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांच्याऐवजी ऐनवेळी सहभागी झालेल्या पं. अजय पोहनकर यांनीही बहार उडवून दिली. मी मूळचा पार्लेकर आहे, त्यामुळे येथे आवर्जून आलो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्रथम बिहाग रागाने सुरुवात करून त्यानंतर ‘याद पिया की आए’ व अन्य ठुमऱ्या गाऊन त्यांनी टाळ्या वसूल केल्या. या महोत्सवाचे हे तेविसावे वर्ष असून रसिकांचा त्यास दरवर्षी हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभतो. यापुढेही असेच नामांकित कलाकार या महोत्सवात सहभागी होऊन रसिकांना आनंद देतील, अशी ग्वाही या महोत्सवाचे आयोजक व हृदयेश आर्टस्चे अविनाश प्रभावळकर यांनी दिली. आनंद सिंग यांनी या महोत्सवाचे नेटके सूत्रसंचालन केले.