भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोना  संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे पालिका आता दफनभूमीकरीता योग्य जागेचा शोध घेत आहे. मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाचा आकडा तीन हजारांच्या जवळ पोहोचला आहे. तर आतापर्यंत तब्बल १२५हून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी प्रतिदिवस शंभरहून अधिक रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे.  शहरात मोठय़ा प्रमाणात विविध धर्मातील नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मात मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत वेगळी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शन तत्त्वानुसार करोनाबाधित मृतदेहास पुरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून दफनभूमीचा शोध करण्यास सुरुवात केली आहे. या दफनभूमीचा लवकरच शोध घेऊन योग्य ती उपाययोजना निर्माण करण्यात येणार असल्याचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांनी सांगितले आहे.

पालिकेच्या आरक्षण भूखंडातील जागेत ही दफनभूमी तयार करण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्या दफनभूमीमुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास निर्माण होऊ  नये म्हणून योग्य जागा निवडण्यास प्रशासनासमोर अडथळे निर्माण होत आहेत.