शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैद्यकीय उपचारांचा खर्च हेही एक कारण असल्याचे दिसून आल्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये वैद्यकीय मदतीची यंत्रणा बळकट करतानाच या जिल्ह्य़ांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ताततडीने भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अधिकार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यातील १४ जिल्हे हे प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे असून येथे आरोग्य व्यवस्थेतील अनेक पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय उपचारावर खाजगी रुग्णालयात कराव्या लागणाऱ्या उपचारामुळेही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या आरोग्या विभागाच्या बैठकीत उघड झाल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील सात दिवसात पदे भरण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.