दिवाळी तोंडावर असताना रविवारी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मेगाब्लॉकचा आणि त्या अनुषंगाने गर्दीचा सामना करावा लागणार आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर मार्गावर रूळ तसेच ओव्हरहेड वायर यांच्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान तीनही मार्गावरील सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील.
मध्य रेल्वे
कुठे – ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.
परिणाम – ठाणे ते कल्याण दरम्यानची कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाडय़ा ठाणे ते कल्याण या दरम्यान फक्त डोंबिवली स्थानकावर थांबतील. ठाणे-कल्याण दरम्यानच्या इतर स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली व कल्याण स्थानकावरून अप धिम्या गाडीने प्रवास करावा लागेल. अप जलद मार्गावरील गाडय़ा नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला येथेही थांबतील. डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे – पनवेल ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा.
परिणाम – पनवेलहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे आणि अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द असतील. मुंबई सीएसटीहून सुटणाऱ्या पनवेल लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-पनवेल मार्गावरील पनवेल लोकल तसेच पनवेलहून सुटणाऱ्या ठाणे लोकल रद्द असतील. मात्र मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस व ठाणे ते नेरूळ यांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे – मरीन लाइन्स ते माहीम दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम – मरीन लाइन्स ते माहीम या डाऊन धिम्या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड या स्थानकांवर थांबणार नाहीत. १२ डब्यांच्या सर्व गाडय़ा माहीम आणि लोअर परळ येथे दोन वेळा थांबतील.