मुंबई : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ मार्गावरील पासधारकांना आता उपनगरीय लोकल सेवेप्रमाणे कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. २५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क (मासिक पास) भरून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. परिणामी प्रवासानुसार शुल्क हे सूत्र आता राहणार नाही.

याआधी मेट्रो पासधारकांना उपनगरीय लोकलप्रमाणे अमर्याद प्रवासाची सोय नव्हती. प्रवासाच्या फेऱ्यांनुसार पासधारकांचे पैसे वळते होत होते. त्यामुळे अतिरिक्त प्रवास झाल्यास महिन्याआधीच पास संपून जात असे. परिणामी प्रवाशांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत. आता मात्र उपनगरीय रेल्वेप्रमाणे प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. वर्सोवा ते घाटकोपर या प्रवासासाठी प्रवाशांना महिन्याकाठी १३७५ रुपयांऐवजी १४०० रुपये भरून अमर्याद प्रवास करता येणार आहे. घाटकोपर ते अंधेरी या प्रवासासाठी ११०० रुपयांऐवजी ११२५ रुपये आकारले जातील.