पावसाळ्यात मुंबईत हमखास तुंबणाऱ्या ठिकाणांव्यतिरिक्त नवे भाग बुधवारच्या पावसामुळे जलमय झाले. मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी परिसर हे भाग पहिल्यांदाच तुंबले. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सागरी किनारा मार्गाच्या कामाकडेही बोट दाखवले जात आहे.

दक्षिण मुंबईत बुधवारी चार तासांत सरासरी ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत कुठेही, कितीही पाऊस पडला तरी मंत्रालय आणि ओव्हल मैदानाचा परिसर, नरीमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह या परिसरात कधीही पाणी साचत नाही, अशी या भागांची ख्याती आहे. मात्र, बुधवारच्या पावसात हे भागही तुंबले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त करणारी ध्वनिचित्रफित ट्वीटरवर प्रसारित केली. आयुष्यात पहिल्यांदाच या भागात पाणी तुंबलेले पाहत असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी त्यात व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयाच्या परिसरातही पावसाचे पाणी शिरल्याने न्यायालयातील बाग जलमय झाली होती. गिरगाव चौपाटीहून मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतके  पाणी साचले होते की, रस्ता संपून समुद्र किनारा कुठून सुरू होतो, हेच समजत नव्हते. हा परिसर पहिल्यांदाच इतका जलमय झाल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. नव्या जलमय भागांमुळे पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, दक्षिण मुंबईत विक्रमी पाऊस झाला. त्यातच भरती असल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे.

सागरी मार्गासाठीचा भराव कारणीभूत

पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात मोठय़ा प्रमाणावर भराव टाकला जात असल्याचे हे दुष्परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी केला. या मार्गासाठी ब्रीच कॅण्डी, वरळी अशा ठिकाणी भराव टाकला जात असला तरी समुद्राचे पाणी कोणत्याही भागातून बाहेर पडू शकते. निसर्गाच्या विरोधात जाऊन विकासकामे केल्यास निसर्गही त्याची प्रतिक्रिया अशा रुपात देतो, असे मत भतेना यांनी मांडले.

ठाण्यातही तुंबणारी नवी ठिकाणी

ठाणे पालिका क्षेत्रात तुंबणाऱ्या ठिकाणांमध्ये यंदा भर पडली आहे. आनंदनगर, बारा बंगला कोपरी, ओवळा, कावेसर नाका, घोडबंदर डी-मार्ट परिसर, कापूरबावडी, नौपाडा, उथळसर, भास्कर कॉलनी, कळवा, हजुरी, तीन हात नाका, कासारवडवली ही नवी ठिकाणी जलमय झाल्याचे आढळले आहे.

रस्त्यांवर तुळशी तलावाच्या दुप्पट पाणी

मुंबईत गेल्या चार दिवसांत रस्त्यावर साचलेले तब्बल १७१४ कोटी लीटर पाणी पंपांद्वारे समुद्रात सोडण्यात आले आहे. चार दिवसांत तुळशी तलावातील पाण्याच्या दुप्पट पाणी उपसल्याचे पालिकेने म्हटले आहे.

ओहोटी असतानाही पाणी साचलेलेच

बुधवारी दुपारी सव्वा वाजता समुद्राला भरती होती आणि संध्याकाळी सहा वाजता ओहोटी होती. दुपारी ३ ते ४ वाजता अतिवृष्टीमुळे पाणी साचले. मात्र, ओहोटी असतानाही पाणी ओसरले नाही. गुरुवारी पहाटे अडीच-तीनच्या सुमारास म्हणजे बारा तासांनी दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांतून पाणी ओसरले.