आमदार वारिस पठाण यांची निलंबन मागे घेण्याची मागणी
‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती कोणावरही करु नये, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले असून त्यांच्या भूमिकेचा आदर करुन भाजप सरकारने निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केली. आपल्याला राज्यघटनेबद्दल आदरच असून आपण कोणत्याही तरतुदींचा भंग केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘भारत माता की जय’ म्हटणार नाही, असे सांगितल्यावर विधानसभेत गदारोळ होऊन पठाण यांना अधिवेशन काळात निलंबित करण्यात आले आहे. पण अशी सक्ती कोणावरही करता येणार नाही, तशी राज्यघटनेत तरतूद नाही, असे पठाण यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर मोहन भागवत यांनी सक्ती करु नये, अशी भूमिका घेतल्याने पठाण यांच्या निलंबनाबाबत सरकार फेरविचार करणार का, हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
संघ आणि सरसंघचालक भागवत यांच्या भूमिका व मतांचा भाजपकडून आदर केला जातो. या मुद्दय़ावर भागवत यांनी व्यक्त केलेल्या मताशी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकार सहमत आहे का नाही, असा सवाल पठाण यांनी केला. जर भागवत यांची भूमिका मान्य असेल, तर सरकारने स्वतहून निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी पठाण यांनी केली. अन्यथा भागवत यांच्या भूमिकेशी ते सहमत नाहीत, असा निष्कर्ष काढता येईल, असे सांगून पठाण म्हणाले, बाजू मांडण्याची संधी न देता निलंबित करण्यात आले. आता भागवत यांची मते मान्य असतील, तर याचा फेरविचार करावा. सुप्रसिध्द घटनातज्ज्ञ सोली सोराबजी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अशी सक्ती करता येणार नसल्याचे म्हटले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती नको
एक्स्प्रेस वृत्तसेवा : ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यासाठी कोणावरही सक्ती करू नये, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे. आपण असा भारत घडवू की, लोकांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे भारत माता की जय म्हटले पाहिजे, असे भागवत म्हणाले. भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण जगाने भारत माता की जय म्हणण्यासाठी आपण त्यांच्यापुढे मूल्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला श्रेष्ठ भारत निर्माण करावा लागेल. त्यानंतर नागरिक उत्स्फूर्तपणे भारत माता की जय म्हणतील. त्यासाठी कोणावर जबरदस्ती करण्याची गरज नाही, असे भागवत म्हणाले.