मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल केला नाही तर ताण वाढत जाईल असं मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचं एक कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मेट्रो ३ मुळे रस्त्यावरची ३५ टक्के वाहतूक कमी होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मेट्रोसारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

आधुनिक शहरामधील आधुनिक वाहतूक व्यवस्था या बिषयावर बोलताना अश्विनी भिडे यांनी शहरात वाहतुकीची शिस्त मोडत चालली असल्याचं खंत बोलून दाखवली. तसेच दुचाकींची संख्या वाढत चालली असून पुण्यालाही मागे टाकू अशी शक्यता निर्माण झाली आहे. वाहनांची वाढती संख्या वाहतुकीवर परिणाम करणारी असून गती कमी झाली. अॅपवर आधारित वाहनांची संख्या वाढत असून ओला आणि उबर येण्यासाठीही उशीर होतो. मुंबईत गर्दी जास्त झाली आहे आणि वेग कमी असं महत्वाचं निरिक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं.

अश्विनी भिडे यांनी यावेळी सिंगापूर आणि टोकियाचं उदाहरण देताना सिंगापूर आणि टोकियोत वाहनांची संख्या आपल्यापेक्षाही जास्त आहे. पण त्यांनी ज्याप्रकारे सुविधा उपलब्ध केली आहे, त्यामुळे लोक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात असं सांगत मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था पुर्ववत, गुणवत्तेची तसंच सुरक्षित करणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. वाहतूक व्यवस्था निर्माण करताना दर्जा आणि सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे. खासगी वाहनांची संख्या मर्यादेबाहेर जात असून खासगी वाहनांनामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला पाहिजे. तसेच फक्त झाडं लावल्याने प्रदूषण कमी होणार नाही, त्याच्या पलीकडे जाऊनही आपण विचार केला पाहिजे असंही त्या म्हणाल्या. पुढच्या १० वर्षात प्रकल्प पूर्ण करु शकलो तर वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या प्रश्नवार मात करु शकतो असा उपाय सांगताना मेट्रो ३ प्रकल्पामुळे होणारे फायदे त्यांनी यावेळी विषद केले.

“मेट्रोमुळे सध्या वाहतूक व्यवस्थेवर असणारा भार फार कमी होणार आहे. मुंबईची क्षमता पाहता त्या तोडीचे प्रकल्प असणं गरजेचं आहे, ट्रेनमधून पडून लोकांचे मृत्यू होताहेत, अनेकजण जखमी होतात. पण आपल्याला इतकी सवय झाली आहे की आपण फक्त ते पाहत राहतो. पण त्यासाठी काहीच करु शकत नाही का ?”, असा सवालही भिडे यांनी उपस्थित केला. तसेच याचं उत्तर सांगताना आधुनिक व्यवस्था मेट्रो-३ मध्ये असल्याचं सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, “आधुनिक शहरात आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारणं तातडीचं असून प्रकल्पांना विलंब होण सगळ्यांसाठी कठीण गोष्ट आहे. सर्व मेट्रो प्रोजेक्ट वेळेत झाले तर वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुधारेल. पुढील १० वर्षात प्रकल्प उभं राहणं गरजेचं आहे” तसंच वाहतूक व्यवस्था एकमेकांशी जोडली गेलेली असणं गरजेचं आहे सांगताना प्रवाशाला महत्त्वं देणं गरजेचं आहे यावर त्यांनी जोर दिला. भलेही प्रवाशाला चार ठिकाणी बदल करावा लागला तरी ते सहज असलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“मेट्रो हा विषय आला की वृक्षतोडीची चर्चा होते, मात्र, विरोध करणारे जाणुनबुजून हा विषय समोर आणतात. या विरोधामुळे प्रकल्पाला विलंब होतो. यामुळे लोकांना ज्या वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागतो ती सहन करण्याचा काळ वाढतो. एक दिवस मेट्रोचं काम थांबलं तर चार कोटींचं नुकसान होतं. यामुळे प्रकल्पाची किंमत वाढते. या दोन्ही गोष्टी मेट्रोसाठी चांगल्या नाहीत. प्रकल्पाला विरोध होत असताना जाणत्या लोकांकडून समर्थन मिळण्याचीही गरज आहे”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

‘लोकसत्ता’च्या वतीने ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जात आहे. या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी आहेत.

‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जात आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ या कार्यक्रमात आपली भूमिका मांडत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन केलं जात आहे.

प्रायोजक..
लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.