News Flash

राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे!

पक्षात जान आणण्याचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे

मनसेचा हा शेवटचा पराभव असेल, असे विधान पक्षाच्या वर्धापनदिनी काढल्यानंतर आता लोकसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्षात जान आणण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेच्या नेत्यांच्या आज राजगड येथे झालेल्या बैठकीत मेळाव्यांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांना तक्रारी करण्याचा अधिकार असून नेते व सरचिटणीस बदलण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच विभाग अध्यक्षांची बैठक दादरच्या राजगड येथे पार पडली. या बैठकीत नेत्यांवरील कार्यकर्त्यांची वाढती नाराजी आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यास नेते कमी पडल्याचे राज यांचे विधान लक्षात घेऊन नेते व सरचिटणीस बदलाबाबत राज हेच निर्णय घेतील असे मान्य करण्यात आले. पक्षाचे काम राज्यव्यापी पसरण्यासाठी राज यांनी नऊ नेते व नऊ सरचिटणीसांची नियुक्ती केली. तसेच तब्बल सात प्रवक्तेही नेमले होते. महापालिका निवडणुकीत पक्षाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी नेत्यांवर संबंधित पालिकांची जबाबदारीही देण्यात आली होती; तथापि बहुतेक नेत्यांनी त्यांना सोपविलेले काम योग्य प्रकारे पार तर पाडलेच नाही, उलट उमेदवारी देताना अनेक घोळ घातल्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. राज यांच्याच आदेशानुसार मुंबईतील सर्व विभागांत कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले, त्यामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्येही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या उमेदवाराविरोधात काम करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना नेते व सरचिटणीसांकडूनच संरक्षण दिले जात असले तर काम करायचे कसे, असा सवालही पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून असंख्य प्रश्न आहेत. मुंबईतही अनेक नागरी विषय असताना नेत्यांचे साधे अस्तित्वही जेथे दिसत नाही तेथे मार्गदर्शनाची काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून या पाश्र्वभूमीवर लोकसभानिहाय मेळावे घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत मे महिन्यात राज हे मेळावे घेणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:40 am

Web Title: mns leaders speak against raj thackeray on mns agenda
Next Stories
1 विरोधकांच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपची मुसंडी!
2 राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ
3 बांधकाम सुरू न करता विकासकाला ३० टक्के रक्कम