एक-दीड महिन्यात सुविधा; तपासातून अंग काढणाऱ्या पोलिसांना लगाम

भ्रमणध्वनी गहाळ झाल्यानंतर किंवा त्याची चोरी झाल्यानंतर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करायला गेल्यास अनेकदा पोलिसांकडून होत असलेली टोलवाटोलवी आता संपणार आहे. भ्रमणध्वनी चोरीची तक्रार थेट ऑनलाइन करण्याची सुविधा लवकरच राज्य पोलिसांकडून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे तक्रारदाराला पोलीस ठाण्याला मारावे लागणारे खेटे कमी होणार आहेत. तसेच भ्रमणध्वनी चोरी झालेला असतानाही तो हरविल्याची तक्रार नोंदवून तपासातून अंग काढून घेणाऱ्या पोलिसांनाही चाप बसणार आहे.

गर्दीत, सार्वजनिक वाहनांत प्रवास करताना खिसेकापू, चोरटय़ांकडून नागरिकांच्या भ्रमणध्वनीची चोरी होते. भ्रमणध्वनी चोरी झाल्याची तक्रार घेऊन गेल्यानंतर अनेकदा नागरिकांना पोलीस ठाण्यात नेमकी कुणाकडे तक्रार करायची, हे माहिती नसते. तसेच, तक्रार नोंदवून घेण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते. तक्रार नोंदवून घेतानाही भ्रमणध्वनीची चोरी नाही, तर गहाळ झाल्याची तक्रार नोंदवा, अन्यथा सतत ठाण्यात यावे लागेल, अशी भीती घालून पोलीस तपासातून अंग काढून घेतात. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य पोलिसांतर्फे लवकरच ऑनलाइन तक्रारीची सुविधा आणण्यात येत आहे.

भ्रमणध्वनीची तक्रार घेतली जात नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून ऑनलाइन तक्रारीची सुविधा आणण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  या वेबपेजचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील एक ते दीड महिन्यात ते जनतेसाठी खुले होईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

  • तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याने लवकरात लवकर तक्रारदाराशी संपर्क साधून त्याला प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यासाठी बोलावण्यात येईल. तसेच, या तक्रारीचे पुढे काय झाले, याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याने पोलीस अधिकाऱ्याचे उत्तरदायित्व वाढणार आहे.