20 October 2019

News Flash

पोलिसांना मारहाण करणारी मॉडेल रेश्मा मलिक अटकेत; न्यायालयीन कोठडीत रवानगी

न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे भायखळा कारागृहात तिची रवानगी करण्यात आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

ओशिवरा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपायाला धक्काबुक्की करणाऱ्या रेश्मा मलिक या मॉडेलवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आणखी एका गुन्ह्यातही मॉडेल रेश्माच्या चौकशीसाठी न्यायालयाने दिंडोशी पोलिसांना गुरुवारी परवानगी दिली. त्यामुळे शुक्रवारी दिंडोशी पोलिसांनी कारागृहातून तिचा ताबा घेतला. या प्रकरणाची अधिक चौकशी दिंडोशी पोलीस करीत आहेत.

व्यावसायाने मॉडेल असलेली रेश्मा दोन महिन्यांपूर्वी एका कामानिमित्त दिंडोशी पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी तिच्यात आणि एका महिला पोलीसामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती त्यावेळी रेश्माने महिला शिपायाला धक्काबुक्की केली होती. दरम्यान, दिंडोशी पोलिसांनी मॉडेल रेश्मा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि ३५३ नुसार गुन्हा नोंदविला होता. मात्र, ती फरार झाली होती.

याच मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यातही लेखी अर्जावर कारवाई केली नाही म्हणून पोलिसांना शिवीगाळ करीत पोलीस ठाण्यातील पाच महिला पोलिसांना धक्काबुक्की केली होती. त्याचबरोबर ओशिवरा पोलीस ठाण्यातही तिने पोलीस शिपायाला केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करताच रेश्माने दिल्लीत पळ काढला.

पोलीस रेश्माच्या गोरेगाव येथील प्लॅटवर गेले असता त्याला टाळे आढळले. रेश्मा दिल्लीत असल्याची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी दिल्लीतील पार्लमेंट पोलीस ठाण्याच्या मदतीने अशोक रोडवरील साहिब गुरुद्वारा, बॅग्स या बंगल्यातून रेश्माला सोमवारी अटक केली. तिला आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी तिला अटक केली. न्यायालयात नेले असता दुसऱ्या गुन्ह्यातही तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तिची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे मॉडेल रेश्मा मलिक सध्या भायखाळा कारागृहात आहे.

First Published on January 11, 2019 11:29 pm

Web Title: model reshma malik detained police assaulted to be sent to judicial custody