आज, उद्या मुंबईतील नऊ केंद्रांवर एकाच पाळीत लसीकरण

मुंबई : गेले नऊ महिने हाहाकार उडवणाऱ्या करोनाला प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे कूपर रुग्णालयातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करतील. त्यानंतर सकाळी साडेदहापासून लसीकरण सुरू होईल. पुढील दोन दिवस एकाच पाळीत लसीकरण होणार असले तरी, सोमवारपासून दोन पाळ्यांत हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याने दरररोज आठ हजार जणांना डोस देणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला करण्यात आलेल्या लशींच्या साठ्यापैकी मुंबईला साठा बुधवारी साठा मिळाला होता. या लसकुप्या शुक्रवारी दुपारी शहरातील नऊ लसीकरण केंद्रांवर वितरीत करण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. महापौर किशोरी पेडणेकर यादेखील यावेळी हजर होत्या. लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाली असली तरी, ही मोहीम आव्हानात्मक असल्याचे पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. बालकांच्या लसीकरणाचा आपल्याकडे अनुभव आहे. परंतु १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी इतक्या मोठ्या पातळीवरील प्रथमच लसीकरण केले जात असल्याने सर्वच स्तरांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.  संध्याकाळी चारपर्यंत लसीकरणाची वेळ असून प्रत्येक कक्षामध्ये १०० याप्रमाणे चार हजार  लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी पालिकेच्या ७ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून आणखी १० हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे महापौरांनी नमूद केले.

शनिवारी व रविवारी एका पाळीमध्ये लसीकरण केले जाईल. सोमवारपासून सकाळी सात ते दोन आणि दुपारी दोन ते नऊ अशा दोन पाळ्यांत दरदिवशी आठ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

टोकन पद्धतीचा वापर

एका केंद्रावर लसीकरणासाठी आठ तासांचा अवधी लाभार्थ्यांना दिला असला तरी ५०० लाभार्थी येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस टोकन देऊन नंबरप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्रानुसार कक्षांची यादी

  • कूपर रुग्णालय, नायर रुग्णालय, के ईएम, लोकमान्य टिळक, राजावाडी, कांदिवली शताब्दी रुग्णालय आणि बीके सी करोना केंद्र प्रत्येकी पाच कक्ष
  • भाभा रुग्णालय (वांद्रे)- तीन कक्ष
  • व्ही. एन. देसाई(सांताक्रूझ) – दोन कक्ष