तीन जणांनी घरी येऊन ‘तुमच्या मुलाला बघून घेतो आणि तो मिळाला नाहीतर घर पेटून देतो’, अशी धमकी दिल्याने भयभीत झालेल्या एका आईने शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबरनाथमधील कोहजगाव परिसरातील चिंचपाडा येथे ही घटना घडली. हे तिघेजण फरार आहेत.
पोलिसांनी सांगितले, कोहजगाव परिसरात शुक्रवारी रात्री जावेद खान आणि राहुल, विलास, विकास आणि हेमराज (पूर्ण नावे नाहीत) या दोन गटात तुफान भांडण झाले. या वादाचे पर्यवसान एकमेकांना धमक्या देण्यात गेले. त्यानंतर हे तिघेजण जावेद खानच्या घरी त्याला जाब विचारण्यासाठी गेले. तेथे तो आढळून आला नाही. तेथे जावेदची आई रेहाना फिरोज खान (४०) होती. त्यांनी मुलगा भेटला नाहीतर घर जाळण्याची धमकी तिला दिली. या धमकीने भयभीत झालेल्या या मातेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2013 2:29 am