16 February 2019

News Flash

खटाववाडीतून ‘मौज’चा मुद्रण-विराम!

मौज प्रकाशन गृहाचे एक भागीदार श्रीकांत भागवत यांनी ‘लोकसत्ता’शी  बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.

छायाचित्र सौजन्य फेसबुक

प्रकाशनसंस्था मात्र सुरूच राहणार

गिरगावातील खटाववाडीच्या रंगीबेरंगी मराठमोळ्या संस्कृतीला गांभिर्याचं  आणि साहित्यिक जाणिवेचं परिमाण जोडणाऱ्या ‘मौज’ने तेथील आपले मुद्रणालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुबक, आकर्षक आणि उत्तम छपाईचा वारसा ५० वर्षांहून अधिक काळ जपून या मुद्रणालयाने असंख्य मराठी ग्रंथांवर आपली अमीट नाममुद्रा कोरली आहे. मौजचे येथील मुद्रणालय बंद होत असले तरी प्रकाशन विभाग सुरूच राहणार असून पार्ले येथील मुद्रणालयात केवळ ‘मौज’चीच पुस्तके मुद्रित होणार आहेत. मौज प्रकाशन गृहाचे एक भागीदार श्रीकांत भागवत यांनी ‘लोकसत्ता’शी  बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. विष्णुपंत भागवत यांनी सुरू केलेल्या मौज प्रकाशनगृहाचा स्वत:चा छापखाना हे आगळे वैशिष्टय़ होते. बंधू श्री. पु. भागवत आणि नंतर अन्य भागवत बंधूंनी विष्णुपंतांना मौजच्या कामात साथ दिली.  पुस्तकमुद्रणाची वैशिष्टयपूर्ण परंपराच मौजच्या छापखान्याने निर्माण केली. छपाईसाठी आलेला मजकूर जास्तीत जास्त सुबक आणि निर्दोष असावा याची काळजी विष्णुपंत सतत घेत असत. ते आत्मसंतुष्ट नव्हते, तर स्वत:च्याच कामाची छाननी करणारे चिकित्सक होते. मुद्रण हे एक शास्त्र आणि एक कलाही असल्याची त्यांची भावना होती. तोच वारसा पुढे श्री. पु. आणि अन्य भागवत बंधूनी चालविला. मौजच्या ६०० हून अधिक प्रकाशित पुस्तकांतून ते स्पष्टच होते. सुरुवातीच्या काळात श्री. पु. भागवत, ग. रा.कामत, राम पटवर्धन आणि पुढे श्रीनिवास विनायक कुळकर्णी, गुरुनाथ सामंत, मोनिका गजेंद्रगडकर आदींच्या संपादन कौशल्यामुळे मौज प्रकाशन व मुद्रणालयाने मराठी साहित्य क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.

मौज प्रकाशनाच्या ‘सत्यकथा’, ‘मौज’ या दर्जेदार नियतकालिकांसह ‘मौज’च्या पुस्तकांची छपाई खटाववाडीतील याच छापखान्यात होत असे. तसेच अन्य काही प्रकाशकांची पुस्तकेही याच मुद्रणालयातून मुद्रित होत असत. गेल्या दोन ते तीन पिढय़ांतील बहुतांश मान्यवर लेखकांची पुस्तके मौजने प्रकाशित केली आहेत. उत्कृष्ट संपादनाचा ध्यास, अचूकतेचा आग्रह आणि सुरेख छपाई यामुळे मौजची पुस्तके आगळी ठरली.

एकेकाळी गिरगाव-खटाववाडीतील मौजचे कार्यालय हे मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिलींनी ओसंडून जात असे. या मैफिलींच्या आठवणी आता सुखद स्मरणरंजनाचा भाग बनल्या असताना खटाववाडीतील मौज मुद्रणालय हेही त्यात जमा होत आहे.

बदलती परिस्थिती, सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव, मुद्रणालयातील कमी झालेले काम आणि कौटुंबिक अडचणी यामुळे खटाववाडी येथील मुद्रणालय बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्थात प्रकाशन व्यवसाय  मात्र सुरूच राहणार आहे. मौजची २० ते २५ पुस्तके प्रकाशित होणार असून सध्या त्यावर काम सुरू आहे. आमच्या स्वत:च्या पुस्तकांच्या छपाईचे काम मौजच्या विलेपार्ले येथील मुद्रणालयात होणार आहे. अपवाद म्हणून बाहेरील अगदी निवडक पुस्तकांची छपाई तिथे केली जाईल पण हळूहळू बाहेरील छपाईचे काम बंद केले जाईल.

– श्रीकांत भागवत, मौज प्रकाशनाचे एक भागीदार

First Published on March 11, 2018 3:50 am

Web Title: mouj prakashan gruh in girgaon to shut down the printing press