दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनोरेल शनिवारपासून चेंबूर ते वडाळा या मार्गावरुन धाऊ लागली. त्याचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, यातील तांत्रिक दोषामुळे ही रेल्वे रविवारी पुन्हा बंद पडली. चेंबूर नाका स्टेशनजवळ ही मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ही बिघडलेली मोनरेल पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही मोनोरेल पुन्हा पूर्ववत सुरु झाली.

नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनो बंद होती. दहा महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनो रेल्वे शनिवारपासून पुन्हा सुरू झाली. देशातील ही पहिली मोनो रेल्वे फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली होती.

नव्या वेळापत्रकानुसार, चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो पुन्हा धावणार आहे. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार प्रवासी भाडय़ात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला.

चेंबूर ते वडाळा या मार्गावर १ सप्टेंबरपासून सकाळी ६ ते सायंकाळी १० या कालावधीत मोनो धावली. दर १५ मिनिटांच्या अंतराने स्थानकांमध्ये मोनो दाखल होते. तर दिवसभरात तिच्या १३० फेऱ्या होतात. वडाळा स्थानकामधून रात्री ९.५३ आणि चेंबूर स्थानकामधून रात्री १०.०८ मिनिटांनी शेवटची मोनोरेल सुटेल, असे वेळापत्रक आखण्यात आले आहे.