मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या कोटय़वधींच्या जमिनींवर अनेकांचा डोळा असून यातील मोक्याचा जगांवरील अनेक जमिनी खाजगी उद्योजकांनी भाडेत्त्वावर दीर्घ मुदतीसाठी पद्धतशीरपणे मिळविल्या आहेत. हे सारे कमी ठरावे म्हणून गोराई बस आगारातील दीड हजार चौरस फूटाची जागा निविदाच न मागवता अल्प भाडय़ावर दीर्घकाळासाठी एका बँकेला देण्याचा घाट बेस्ट समितीच्या बैठकीत मनसेने उधळून लावला.
गेल्या काही वर्षांमध्ये बेस्ट प्रशासनाने बाजारभावापेक्षा कमी दराने अनेक मोक्याच्या जागा दिल्याचा गंभीर आरोप कागदपत्रांसह मनसेचे नगरसेवक केदार उंबाळकर व दिलीप कदम यांनी बेस्टच्या बैठकीत केला. कोणतीही निविदा न मागवताच एनकेजीएसबी बँकेला ८४ रुपये चौरस फूट या दराने पंधरा वर्षांसाठी जागा देण्यास विरोध केला.
यापूर्वी गोराई आगारातील अडीच हजार चौरस फूटांची जागा १९ रुपये चौरस फूट या दराने दिली आहे. याच जागेला लागून असलेली पाचशे चौरस फुटाची जागा आणि पहिल्या मजल्यावरील हजार चौरस फुटाची जागा कोणत्याह निविदेशिवाय बँकेला देण्याचा प्रस्तावच प्रशासनाने समितीपुढे आणला.
यापूर्वी हीच जागा ७० रुपये चौरस फूट या दराने देण्याचा प्रशासनाने आणलेला प्रस्ताव मनसेने उधळून लावला होता. त्यानंतर १४ रुपये वाढवून म्हणजे ८४ रुपये फूट या दराने सदर जागा देण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने आणला. निविदा न काढताच एका बँकेला मोक्याची जागा का देण्यात येत आहे, असा सवाल कदम व उंबाळकर या मनसे नगरसेवकांनी केल्याने त्याचे ठोस उत्तर प्रशासनाला देता आले नाही, सेनेचीही अडचण झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव प्रशासनाला मागे घ्यावा लागला.