मृत मुलाला जिवंत करण्यासाठी त्याचा मृतदेह १० दिवस चर्चमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. अंधश्रद्धेच्या या घटनेने खळबळ माजली असून मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.

मुंबईतील चिंचपोकळी भागात राहणाऱ्या मिशाख नेव्हीस (वय १७) या मुलाचा २७ ऑक्टोबरला कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्याचे वडील ऑक्टोविमो जोसेफ हे नागपाडा येथील ‘जिजस फॉर ऑल नॅशन’ चर्चमध्ये बिशप आहेत. मुलाचा मृतदेह चर्चमध्ये ठेवून प्रार्थना केल्यास तो पुन्हा जिवंत होईल, असे त्यांना वाटत होते. त्यांनी आठ दिवस मिशाखचा मृतदेह नागपाडा येथील चर्चमध्ये ठेवला होता. नागपाडा पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली. मिशाखच्या वडिलांनी पोलिसांसमोर तयारीही दर्शवली. मात्र अंत्यसंस्कार न करता त्यांनी मुलाचा मृतदेह अंबरनाथमधील चर्चमध्ये आणला.

अंबरनाथमधील चर्चमध्ये मुलाचा मृतदेह ठेवून जोसेफ यांनी पुन्हा प्रार्थना केली. याची माहिती अंबरनाथ पोलिसांना समजली. पोलिसांनी जोसेफ यांना मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या घटनेचा तपास सुरु केल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जोसेफ यांनी मृतदेह पुन्हा नागपाडा येथे नेला आहे.  अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी नागपाडा पोलिसांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.