News Flash

मोनोला वाढदिवशी १८ कोटींच्या तोटय़ाची भेट!

२ फेब्रुवारी २०१४.. कोणी तिचे फोटो काढतेय, कोणी भल्या पहाटे रांगा लावून तिकीट काढतेय.. हारतुरे वाहतेय.. मोनोराणीचे असे कोडकौतुकात स्वागत झाले.

| February 2, 2015 02:47 am

२ फेब्रुवारी २०१४.. कोणी तिचे फोटो काढतेय, कोणी भल्या पहाटे रांगा लावून तिकीट काढतेय.. हारतुरे वाहतेय.. मोनोराणीचे असे कोडकौतुकात स्वागत झाले. मात्र, आज, बरोबर एक वर्षांनी हीच मुंबईकरांची लाडाची मोनोराणी आता नावडती झाली आहे. रोज ३६ हजार ३५२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असताना अवघे १३ ते १४ हजार प्रवासीच मोनोचा वापर करत असल्याने मोनोराणीचा तोटा वर्षभरात सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
चेंबूर ते वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेल २ फेब्रुवारी २०१४ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. उंचावरून धावणाऱ्या या रंगीबेरंगी आणि वातानुकूलित गाडीतून प्रवासाची गंमत अनुभवण्यासाठीच मोनोरेलमध्ये लोकांनी प्रवास केला. ३१ जानेवारी अखेर सुमारे ५१ लाख १० हजार प्रवाशांनी मोनोराणीतून प्रवास केला आहे. या उलट वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेने सहा महिन्यांत पाच कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला.
मुंबईला मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोनोरेलची अपेक्षा होती. पण आतापर्यंत तरी तसे झालेले नाही. मोनोरेलची क्षमता आणि तिच्या फेऱ्यांचे गणित तपासले तर मोनोरेल निम्म्याहून अधिक रिकामीच धावत असल्याचे चित्र होते. दररोज मोनोवरचा खर्च सात लाख रुपये आणि उत्पन्न मात्र अवघे दोन लाख रुपये अशी अवस्था सुरुवातीला होती. त्यासाठी एप्रिल २०१४ मध्ये मोनोरेलची वेळ वाढवण्यात आली. फेऱ्या वाढल्या तरी तोटा कायमच राहिला होता. तीच परिस्थिती आजही कायम आहे. उलट सुरुवातीचे दोन-चार महिने रोज सरासरी १५ ते १६ हजार प्रवासी होते. आता ती संख्या १४ हजारांपर्यंत घटली आहे.
मोनोरेलपोटी रोज सुमारे पाच लाख रुपयांच्या हिशेबाने महिन्याला दीड कोटी रुपयांचा तोटा होता. आता वर्षभराचा विचार करता ही रक्कम १७ ते १८ कोटींच्या घरात गेली आहे.
*मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६८. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रोज ६४ फेऱ्या. तिकीट दर ५, ७, ९ व ११ रुपये.
*मोनोरेलच्या वडाळा ते संत गाडगेमहाराज चौक (महालक्ष्मी रेल्वे स्थानक) या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू. डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण होण्याची ‘एमएमआरडीए’ला आशा.

मोनोरेल सध्या तोटय़ात असली तरी दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर चेंबूर ते महालक्ष्मी स्थानकापर्यंतचा परिसर जोडला जाणार आहे. त्यानंतर रोज सुमारे ३० हजार प्रवासी मोनोरेलमधून प्रवास करतील, असा अंदाज आहे. त्यावेळी मोनोरेलवरील खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधला जाईल, अशी अपेक्षा आहे.
– दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक, एमएमआरडीए

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2015 2:47 am

Web Title: mumbai monorail faces loss
टॅग : Monorail
Next Stories
1 वातानुकूलित डबलडेकरचे भवितव्य अधांतरी
2 आदर्श शिक्षकांना पुरस्कार रक्कमेची प्रतीक्षा
3 ‘बेस्ट’ची दरवाढ मागे घेण्याची मागणी
Just Now!
X