मराठी वृत्तपत्राच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश अनिल खापरे याने त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या नरहर साधू बोधारे यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून तो त्यांच्या नावे वृत्तपत्राच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकत होता. धक्कादायक म्हणजे सिद्धेश खापरे याने १४० बनावट अकाऊंट्स तयार केली होती. तक्रार केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी नाहूर येथून सिद्धेश खापरे याला अटक केली.

सिद्धेश खापरे याने पूर्ववैमनस्यातून नरहर साधू बोधारे यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. त्यांचं घर विकण्याची जाहीरातही त्याने दिली होती. पूर्ववैमनस्यातून आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्राने अकाऊंट बंद केल्यानंतर सिद्धेश याने संपादकांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करुन त्यांच्या नावे आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. सायबर क्राइम सेलकडे तक्रार केल्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी कारवाई करत नाहूर येथून आरोपी सिद्धेश खापरेला अटक केली. चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.