रक्षाबंधनाच्या दिवशी लोकल गाडय़ांना प्रचंड गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन रविवारी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर शनिवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री वसई ते विरारदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.

ब्लॉकच्या काळात ३० टक्के लोकल फेऱ्या रद्द केल्या जातात. लोकल गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतात. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या रविवारी (२६ ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. शनिवारी मध्यरात्री मात्र पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरारदरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.

हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत असेल. त्यामुळे या दोन स्थानकांदरम्यान मंदगती लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील.

बेस्टच्या जादा गाडय़ा

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने २६ ऑगस्टला जादा बसगाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेस्टच्या सर्व आगारांतून वेगवेगळ्या मार्गावर १९७ जादा बस सोडल्या जाणार आहेत.