३१ जुलै रोजी महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये टेलिफोन ऑपरेटरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद अश्फाक शेखला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ३च्या पथकाने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. गिरगाव चौपाटी येथे तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.
 महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये ३१ जुलै रोजी १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील तीन आरोपी यापूर्वीच छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक झाले होते. गुन्हे शाखेने याप्रकरणात दुसऱ्याच दिवशी गोट्या नावाच्या अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. परंतु मोहम्मद अश्फाक शेख हा फरार होता. तो शनिवारी गिरगाव चौपाटीला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती. त्यांनी सापळा लावून त्याला अटक केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.
वेश्येने लावला सापळा
मोहम्मद अश्फाक शेख हा मुंब्रा येथे राहणारा असून विवाहित आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. २२ ऑगस्टला शक्तीमिलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात त्याच्या साथीदारांची धरपकड झाली तेव्हापासूनच तो फरार होता. त्याचे मुंबईतील एका वेश्येशी प्रेमसंबंध होते. पोलिसांची चौकशी सुरू होताच तो याच प्रेयसी असलेल्या वेश्येबरोबर तिच्या गावी हैद्राबादला निघून गेला होता. त्याची प्रेयसी नंतर मुंबईला परत आली पण पोलिसांची अटक टाळण्यासाठी तो तिरूपती, राजस्थान, गुजराथ येथे फिरत राहिला. या काळात तो या वेश्येच्या संपर्कात होता. पैसे संपल्याने तो गुजराथमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोनशे रुपये रोजंदारीवर मजूर म्हणून काम करत होता. पण पैसे पुरत नव्हते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने या वेश्येची माहिती मिळवली आणि तिला विश्वासात घेतले.
पैसे संपल्याने तो आपल्या प्रेयसीकडे येणार होता. तिने याला गिरगाव चौपाटीला पैसे घ्यायला बोलावले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील विजय जाधव, कासम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणात यापूर्वीट अटक केली होती. तर गोटय़ाला या अल्पवयीन आरोपीला धोबीघाट येथून अटक केली.
.अश्फाक पोलिसांच्या तावडीतून निसटला होता
मोहम्मद अश्फाक शेखने ३१ जुलै रोजी आपल्या चार साथीदारांसह टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. पण ती तक्रार पोलिसांकडे नसल्याने आरोपी गाफील होते. या आरोपींनी २२ ऑगस्ट रोजी पुन्हा छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार केला होता. त्या वेळी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने मोहम्मद अश्फाकला चौकशीसाठी आणले होते. छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणात तो नव्हता. त्यामुळे त्याने आपली सुटका करवून घेतली. पण कदाचित पहिले प्रकरण उघडकीस आले तर आपण पकडले जाऊ या भीतीने तो तेव्हापासूनच फरार झाला होता.