अंधेरी येथे स्कूल बसला अचानक लागलेल्या आगीनंतर सुदैवाने त्यात जीवितहानी झालेली नसली तरी यापुढे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच स्कूल बसेसची तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापैकी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तपासणीच्या वेळी आंध्र पॅटर्न राबविण्याचे ठरविले आहे. प्रत्येक स्कूल बसचालकाला आपल्यासमोर कुटुंबीयांचे छायाचित्र लावण्यास सांगण्यात येणार आहे. किमान त्यांच्याकडे पाहून तरी ते काळजी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हैदराबाद वाहतूक पोलिसांनी हा पॅटर्न यशस्वी केला होता. अपघातांच्या वाढत्या संख्येवर उपाय म्हणून तेथील पोलिसांनी प्रत्येक चालकाला आपल्या कुटुंबीयांचे छायाचित्र समोर लावण्यास सांगितले होते. त्याचा परिणाम होऊन अपघातांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. स्कूल बसबाबत वाहतूक पोलिसांनी हाच पॅटर्न वापरण्याचे ठरविले आहे.
अंधेरीतील घटनेनंतर मुंबईतील सर्व स्कूल बसेसची तपासणी करण्यात येणार आहे. स्कूल बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, असा नियम असूनही त्याचे पालन होत नाही. यापुढे प्रत्येक स्कूल बसला याबाबत सक्ती केली जाणार आहे. अन्यथा त्यांना स्कूल बस रस्त्यावर आणण्यास प्रतिबंध करण्याचा विचार केला जात आहे. याबाबत वाहतूक विभागाचे उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले की, स्कूल बसच्या तपासणीला आम्ही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. स्कूल बसला अधूनमधून अपघात होत असतात. सुदैवाने कुठलीही दुर्घटना होत नसली तरी खबरदारी म्हणून या बसेसची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
ज्या अंधेरीत ओशिवरातील मिल्लत स्कूलच्या बसला अचानक आग लागली, त्या परिसरातील सर्व शाळांतील स्कूल बसेसची माहिती डी. एन. नगर वाहतूक पोलिसांनी जमा केली आहे. या स्कूल बसेसची लवकरच तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी ‘आंध्र पॅटर्न’ राबविण्याचा आपला विचार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय धात्रक यांनी सांगितले. हा पॅटर्न विमानतळ वाहतूक परिसरात राबविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.