गेल्या तीन महिन्यांपासून अवघा एक दिवस शुद्ध हवेचा; निम्म्या दिवसांतील हवा श्वसन आजाराला कारक
एकीकडे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर कमालीचा उंचावल्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या वर्षांतील पहिल्या तीन महिन्यांतील अवघ्या एका दिवशी मुंबईकरांना शुद्ध हवेचा लाभ झाला. त्यापैकी जानेवारीतील २५ दिवस तर फेब्रुवारीतील २४ दिवस हवेची पातळी श्वसनाचे विकार होण्याइतपत खालावली होती.
mv02वाढती वाहनसंख्या, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे आणि औद्यागिकीकरण यामुळे मुंबईतील वायुप्रदूषण नेहमीच चिंतेचा विषय राहिले आहे. मात्र, अलीकडच्या काळातील स्थिती या चिंतेबाबत गांभीर्याने पावले उचलण्याकडे बोट दाखवणारी आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने सफर प्रकल्पाअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापासून हवेची प्रतवारी मोजण्यास सुरुवात केली. त्यांच्या निरीक्षणानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत केवळ एकाच दिवशी, १३ मार्च रोजी हवेची प्रतवारी शुद्ध होती. त्याशिवाय ३३ दिवस हवा समाधानकारक होती व त्यातील २२ दिवस हे मार्चमधील होती. फेब्रुवारीनंतर ऋतूबदलानुसार हवेची प्रतवारी सुधारली, मात्र देवनार कचराभूमीच्या आगीमुळे प्रदूषण पुन्हा पुन्हा वाढले, असे सफर प्रकल्पाचे संचालक डॉ. गुफरान बेग म्हणाले. मुंबईतील वाहने व देवनार कचराभूमीला तीन वेळा लागलेली आग यामुळे हवेचे प्रदूषण वाढले. या धुरामुळे हवेतील पीएम २.५ या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या या कणांमुळे फुप्फुसाच्या आजारापासून कर्करोगापर्यंतचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
* बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे कुर्ला संकुल, भांडूप, चेंबूर, माझगाव, वरळी, कुलाबा आणि नवी मुंबई अशा दहा ठिकाणी कार्यरत असलेल्या प्रदूषण मापक यंत्रणेवरून ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड तसेच २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व २.५ ते १० मायक्रोमीटर व्यासाच्या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण समजते.
* शुद्ध हवा आरोग्यासाठी अर्थातच चांगली असते. समाधानकारक हवेत अतिसंवेदनशील व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. निकृष्ट हवेत फुप्फुस तसेच हृदयाचा विकार असलेल्यांना तसेच लहान मुलांना व वृद्धांना श्वास घेण्यात अडचणी येतात. अतिनिकृष्ट हवा सर्वासाठीच त्रासदायक ठरते. तर अत्यंत वाईट हवेमुळे दीर्घकालीन श्वसनविकार होऊ शकतात.