* ६० टक्के मुंबईकरांची जवळपासच्या ठिकाणांना पसंती * कर्जत, टिटवाळा, डहाणूपासून महाबळेश्वपर्यंत भ्रमंती

वर्षभरात येणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा वीकेण्डमधील पर्यटनासाठी आता नवनवीन प्रकारच्या संकल्पना विकसित होऊ लागल्या असून चार दिवसांच्या सुट्टीसाठी चार महिन्यांपूर्वी बेत आखून परदेशवारी किंवा अगदी काश्मीर, कुलू-मनाली करण्यापेक्षा आपल्याच जवळपासची ठिकाणे धुंडाळण्याकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे. येत्या गुरुवारची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी धरून चार दिवस भटकंतीला निघणाऱ्या ६० टक्के  मुंबईकरांनी महाबळेश्वर, माथेरान, खंडाळासारख्या ठिकाणांना पसंती दिली आहे.

नव्या वर्षांच्या पहिल्या नव्या वीकेण्डसाठी पर्यटकांची जास्त मागणी देशांतर्गत पर्यटनासाठी आहे. त्यातही मुंबईकरांची ओढ नेहमीप्रमाणे जवळपासच्या शहरांकडे असल्याने लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, ताडोबा, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याचे ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज’चे करण आनंद यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा देशांतर्गत पर्यटन करणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली असल्याचे ‘इझीगो १’च्या संचालक नीलू सिंग यांनी सांगितले. यातही राज्यातील पर्यटक गोवा, तारकर्ली या ठिकाणांना जास्त पसंती देतात तर राज्याबाहेर कच्छचे रण, जयपूरसारख्या शहरांना मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत टिटवाळा, नेरळ, कर्जत, खोपोली, कसारा, डहाणू यांसारख्या मुंबईपासून जवळ असलेल्या उपनगरांमध्ये रिसॉर्ट्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, ‘फार्म हाऊसेस’ही मोठय़ा प्रमाणावर विकसित झाले असल्याने प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा वीकेण्डसाठी पर्यटकांची इथे हाऊसफुल्ल गर्दी असते, अशी माहिती ‘ट्रॅव्हलर्स स्टुडिओ’च्या गिरीश सावंत यांनी दिली. कसारा-कर्जत भागामध्ये अनेक अ‍ॅग्रो फाम्र्स आहेत. नदीच्या ठिकाणी वसलेल्या या फाम्र्स हाऊसमध्ये छोटय़ा-मोठय़ा प्रमाणावर फळझाडे, फळभाज्यांची शेती केली जाते. त्यामुळे तिथेच राहून चुलीवरचे जेवण, तंबू किंवा कॉटेजमध्ये राहणे, शेतातील फळांची-भाज्यांची चव चाखत चार दिवस आरामात काढणे लोकांना आवडते. डहाणू, पालघरसारख्या ठिकाणीही अनेक फार्म हाऊस, रिसॉर्टस विकसित झाली आहेत. टिटवाळ्यातही पर्यटकांची गर्दी वाढली असल्याने येत्या काही दिवसांमध्ये या परिसरात एमटीडीसीचे निवास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्य पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांनी सांगितले.