आपल्या बेताल वक्तव्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे दोघेही आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून िरगणात उतरले आहेत. जनतेला दुष्काळाच्या झळा बसत असताना पुणे जिल्हय़ातील इंदापूरमध्ये केलेले वक्तव्य अजितदादांना भोवले. पाणी नाही तर लघुशंका करायची का, असे बेजबाबदार विधान अजितदादांनी केले होते. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून घोडदौड करणाऱ्या अजितदादांना हे वक्तव्य फारच महागात पडले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच फटकारले होते. अजितदादांना एकदा नव्हे तर लागोपाठ तीनदा माफी मागावी लागली.  भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी तर स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.  लोकसभा निवडणुकीत आठ कोटी खर्च केल्याची कबुलीच दिल्याने निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर देण्याची वेळ त्यांच्यावर आली. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांचा निवडणूक खर्च कोटीत झाला होता. काही जणांनी १५ ते २० कोटी खर्च केल्याची तेव्हा चर्चा होती. पण कोणीही आपण जास्त खर्च केल्याचे विधान केले नव्हते. उत्साहाच्या भरात मुंडे हे बोलून गेले आणि चांगलेच पस्तावले.
मुंडे चार दिवसांत उत्तर देणार
मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिशीवर चार दिवसांत उत्तर सादर करणार आहेत. त्यांचे उत्पन्न व निवडणुकीत केलेला खर्च यात मोठी तफावत असून याबाबत आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी फेसबुकवर मुंडे यांचे समर्थन केल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुंडे यांनी कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केली असून उत्तराचा मसुदा तयार करण्यात येत आहे. पण त्यांच्याविरुद्ध ‘अथक सेवा संघा’चे अध्यक्ष अनिल गलगली यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, फेसबुकवरील  पान आपले नसल्याचा दावा पंकजा मुंडे यांच्या वतीने करण्यात आला आहे.