मुंबई महापालिकेच्या २०१३-१४ या वर्षांसाठीच्या सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मालमत्ता कराच्या देयकाचा झटका बसलेल्या मुंबईकरांवर आगामी अर्थसंकल्पात मात्र कोणतीही करवाढीचा लादण्यात आलेली नाही. तसेच मुंबईकरांसाठी कोणताही नवा प्रकल्पही या अर्थसंकल्पात नाही.
अर्थसंकल्प पालिका आयुक्त सीताराम कुंटे सोमवारी सोमवारी स्थायी समिती पुढे सादर करणार आहेत. गेल्या वर्षी पाणीपट्टी, मालमत्ता कर, अग्निशमन शुल्क यात वाढ करून मुंबईकरांना झटका दिला होता. मात्र आगामी अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही.
या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पालिका रुग्णालयांमधील खाटांची क्षमता वाढविण्याबरोबरच विविध वैद्यकीय सेवाही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयांतील आधुनिक यंत्रणेसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात आहे. जल विभागासाठीही पुरेशी तरतूद आहे. तसेच पाणी गळती आणि चोरी रोखण्याचे वचन मुंबईकरांना पुन्हा एकदा अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देण्यात आले आहे.  
मुंबईत झपाटय़ाने पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण होत असून मलनि:स्सारण प्रकल्पांना चालना देण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. मलनि:स्सारण प्रकल्पांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे सर्व विभाग माहिती आणि तंत्रज्ञानाने जोडण्याचा संकल्प अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे. सध्या हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेने विशेष भर दिला आहे.