रस्त्याचे, विद्यापीठाचे, स्थानकाचे नामकरण किंवा नामविस्तार हा प्रकार काही नवीन नाही. मात्र, एकाच रुग्णालयाला दोन विभिन्न नावे देऊन वर त्याला रीतसर मंजुरीही द्यायची, हा अजब प्रकार मुंबई महापालिकेत घडला आहे. बोरिवलीतील कस्तुरबा क्रॉस रोड नंबर दोन वरील महापालिका रुग्णालयाबाबत हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाला दोन नावे देण्यात भाजपचे आमदार आणि नगरसेविकांचा पुढाकार आहे. आता हा तांत्रिक घोळ महापालिका प्रशासन कसा निस्तरणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उत्तर मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा बहुजन वर्ग आहे. त्यामुळे बोरिवलीतील या महापालिका रुग्णालयाला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देत ‘माता रमाबाई आंबेडकर रमाई रुग्णालय’ असे करावे असा आग्रह असलेले पत्र भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी यांनी पाठवले. त्याला भाजपच्या नगरसेविका सुनीता यादव व मनीषा चौधरी यांनी पाठिंबा दिला. मात्र, भाजपच्याच नगरसेविका आसावरी पाटील यांनी मात्र रुग्णालयाचे ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय’ असे नामकरण करावे असा आग्रह धरला. राजकारण्यांची डोकेदुखी नको म्हणून पालिकेच्या चिटणीस विभागाने या रुग्णालयाच्या नामकरणासाठी आलेले हे प्रस्ताव आरोग्य समितीच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये समाविष्ट केले. एकाच रुग्णालयाला दोन वेगवेगळी नावे देण्यासाठी एकाच पक्षाच्या आमदार-नगरसेविकांच्या या पत्रांची आरोग्य समिती अध्यक्षांना कल्पना देऊन मगच ते बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करणे आवश्यक होते. मात्र बैठकीमध्येही ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही. अध्यक्षांनी प्रस्ताव पुकारले आणि ते मंजूरही झाले. आता एकाच रुग्णालयाला दोन वेगवेगळी नावे देण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी बैठकीतच या प्रस्तावांची तड लावली असती तर भविष्यात उद्भवणारा वाद मिटला असता. आता आरोग्य समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने आपल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी यासाठी आमदार आणि स्थानिक नगरसेविकेमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी आपले जीवन वेचले. त्यामुळे त्यांचेच या रुग्णालयाला नाव द्यायला हवे. मी स्थानिक नगरसेविका असून हा प्रस्ताव आपण सर्वप्रथम सादर केला होता. त्यामुळे या रुग्णालयाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे.
– आसावरी पाटील, भाजप नगरसेविका