मनोरंजन वाहिन्यांवर जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, सूर्यपुत्र कर्ण, कर्मफलदाता शनी, जय संतोषी माँ, नागीन-२, बालकृष्ण, देव लोक विथ देवदत्त पटनाईक अशा पौराणिक मालिकांना मिळणाऱ्या रसिकांच्या पसंतीमुळे वाहिन्यांचे अर्थकारण पुरते बदलून टाकले. यामुळे दिवसागणिक या मालिकांचे प्रमाणही वाढू लागले आहे. यामुळेच या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पौराणिक कथा सल्लागारांची मागणीही वाढू लागली आहे. याचा थेट फायदा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील पौराणिक कथा-पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला झाला आहे.

पदवीनंतर व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी किंवा पदविका घेण्यासाठी प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी दर वर्षी नाराज होतात. पण गेल्या दोन वर्षांपासून असेच चित्र विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील पौराणिक कथा पदविका अभ्यासक्रमासाठी दिसू लागले आहे. पौराणिक मालिकांचे लिखाण करताना मूळ कथांची उकल करून सांगण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. ही गरज संस्कृत विभागातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी भागवू शकतात हे लक्षात आल्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहिन्यांकडून कामे मिळू लागली. यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला. गेल्या दोन वर्षांत अभ्यासक्रमाच्या सर्वच्या सर्व ५० जागा भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागत असल्याचे विभागाच्या प्रमुख माधवी नरसाळे यांनी सांगितले. विभागात गेल्या २५ वर्षांपासून पौराणिक कथा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमाला हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी प्रवेश घेत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे चित्र पूर्ण बदलले आहे. स्टार प्लस वाहिनीवर आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेसाठी मूळ कथेचे आकलन करून त्यातून नावीन्यपूर्ण कथा लोकांसमोर आणण्याची जबाबदारी पार पाडण्याचे काम नरसाळे यांनी केले. यानंतर वाहिन्यांना पौराणिक मालिका उभ्या करताना अशा तज्ज्ञांचे नेमणूक केल्यास अचूक माहितीसह मालिका पूर्ण करता येऊ शकते हे लक्षात आले आणि त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यास सुरुवात केल्याचे नरसाळे यांनी सांगितले.

नेमकी भूमिका काय?

देवदत्त पटनाईक, अनिश त्रिपाठी, आनंद नीलकंठन यांसारख्या लेखकांची पौराणिक कथांवर आधारित पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर या विषयाचा अभ्यास करण्याचा ओढा वाढू लागला. मालिका करत असताना वाहिन्यांना मूळ कथा जशीच्या तशी नको असते. त्यात कुठे तरी कलाटणी देणारा प्रसंग हवा असतो. हा प्रसंग शोधून देऊन मूळ कथेशी साध्यर्म साधत स्वतंत्र विचाराची नवी कथा मांडण्याचे काम या तज्ज्ञांकडून होत असते. सध्या हा अभ्यासक्रम पूर्ण केलेली हर्षदा सावरकर बिग मॅजिकवरील ‘बालकृष्ण’ या मालिकेवर काम करत आहे तर मृणाल नेवाळक ही सोनीवरील ‘सूर्यपुत्र’ कर्ण या मालिकेसाठी काम करत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना एखादी कथा समाजवून सांगणे किंवा काही संदर्भ शोधून देणे अशी कामेही या वाहिन्यांकडून मिळत असल्यामुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी निर्माण झाली आहे.

काय आहे अभ्यासक्रम?

एक वर्ष पदविकेचा हा अभ्यासक्रम असून यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, विनाश, मृत्यूनंतरचे जग, विविध सण, पर्वत व नद्या अशा विषयांशी संबंधित विविध संस्कृतींतील कथांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासानंतर एकाच गोष्टीविषयी विविध पौराणिक कथांमध्ये काय सांगितले आहे याची उकल केली जाते. या विषयाची लेखी परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका दिली जाते. सध्या या अभ्यासक्रमासाठी ५० जागा आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आणखी १० जागा वाढविण्याचा प्रस्ताव असल्याचे नरसाळे यांनी नमूद केले.

प्रवेश संख्या

वर्ष               विद्यार्थी संख्या

  • २०११-१२ १४
  • २०१२-१३ १०
  • २०१३-१४ २७
  • २०१४-१५ ५०
  • २०१५-१६ ५०