मुंबई : नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग शुक्रवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. मॉलमधील दुसऱ्याआणि तिसऱ्यामजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची बहुतांश दुकाने आगीत भस्मसात झाली. दुकानांमध्ये प्लास्टिक, मोबाइल फोन, बॅटरी, प्रिंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणताना यंत्रणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मॉलला लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांनीही एकच गर्दी केली होती. परिणामी पोलिसांना सतत गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागत होते.

करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे आधीच व्यवसाय ठप्प झालेल्या व्यापाऱ्यांना आगीमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. आगीत दुकानातील सर्व साहित्य, माल आणि फर्निचर जळून खाक झाल्याने या दुकानदारांचे रोजगाराचे साधनच नष्ट झाले. दसरा आणि दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतील या अपेक्षेने बहुतांश व्यापाऱ्यांनी अधिक माल साठविला होता. टाळेबंदीच्या सहा महिन्यांत दुकान बंद राहिल्याने सोसावे लागलेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल या आशेवर हे दुकानदार होते. मात्र गुरुवारी लागलेल्या आगीने होत्याचे नव्हते झाले. आता दुकाने पुन्हा कधी सुरू करता येतील याची वाट पाहण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

‘मॉलमध्ये जवळपास १००० ते १२०० दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात किमान ३० ते ४० लाख रुपयांचा माल होता. आगीत तिसऱ्यामजल्यावरील दुकानाची राखरांगोळी झाली आहे. मार्चमध्ये करोना आल्यामुळे नुकसान सहन करत होतो. आता कुठे दुकाने सुरू करून व्यवसाय काही प्रमाणात सुरू होत होतो तोच आगीने नव्या संकटात टाकले. करोना आणि आगीमुळे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील बचत मोडून संसार चालविण्याची वेळ आली आहे,’ अशी व्यथा मोबाइल अ‍ॅक्सेसरीजचे दुकानदार असलेले आर. एस. पुरोहित यांनी व्यक्त के ली. तर कलीम खान यांचे दुकान या मॉलमध्ये असून ते त्यांनी भाड्याने दिले आहे. ‘टाळेबंदीत पहिल्या चार महिन्यांचे दुकानाचे अर्धे भाडे मिळाले. मात्र दुकानेच बंद असल्याने त्यानंतरचे भाडे भाडेकरूने दिले नाही. आता आगीत दुकानातील मालचे नुकसान झाल्याने उर्वरित भाडे मिळण्याची शाश्वती नाही असे कलीम यांनी सांगितले.

‘ पहिल्या मजल्यावरील माझ्या दुकानात अद्याप आगीने शिरकाव केला नाही. मात्र आग विझविण्यासाठी होत असलेल्या पाण्याच्या फवारणीमुळे दुकानातील माल भिजला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विकता येणार नाही,’ अशी व्यथा श्रवण पटेल मांडतात.

धूर पसरण्याआधीच इमारत रिकामी

सिटी सेंटर मॉलमधील आगीची भीषणता वाढू लागल्याने या मॉलला लागूनच असलेल्या आर्किड एन्क्लेव्ह या ५५ मजली इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. ‘रात्री ९.३० सुमारास अग्निशमन दलाने मॉलवरील डोम मोकळा केला. त्यामुळे धुराचे मोठे लोट आकाशात झेपावले. हा धूर आर्किड एन्क्लेव्ह इमारतीतही पसरू लागला. रहिवाशांनी त्यानंतर इमारतीतून सुरक्षित स्थळी जाण्यास सुरुवात केली. इमारतीच्या समितीनेही पुढाकार घेऊन रहिवाशांना बाहेर पडण्याची सूचना केली. काही रहिवाशांनी नातेवाईकांकडे, तर काहींनी हॉटेलमध्ये आश्रय घेतला,’ अशी माहिती आर्किड एन्क्लेव्ह इमारतीतील रहिवासी मानव फारुख यांनी दिली. तर ‘इमारतीच्या ३६व्या मजल्यावर राहते. डोळे जळजळीचा आणि गुदमरल्याचा त्रास जाणवू लागल्यावर रात्री १२.३० वाजता इमारतीबाहेर आलो. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत रहिवाशांना इमारतीखाली आणण्याचे काम सुरू होते,’ असे रहिवासी झाहिदा शेख यांनी सांगितले.