पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांमध्ये देशाची बदनामी करणारे किस्से सांगून उपस्थितांकडून हशा आणि टाळ्या मिळवतात , अशी टीका करत शिवसेनेने नव्या वादाला तोंड फोडले आहे. परदेशी भूमीवर जाऊन अशाप्रकारे तोंडपाटीलकी करणे योग्य नाही. स्वदेशातील यंत्रणेवर झोड उठवून देश-विदेशात यथेच्छ बदनामी करून जे लोक हशा व टाळ्या मिळवत आहेत त्यांना देशभक्तीचे धडे नव्याने द्यावे लागतील, असे खडे बोल ‘सामना’तील आजच्या अग्रलेखातून भाजपला सुनाविण्यात आले आहेत.
आमच्या देशाला भ्रष्टाचाराने वाळवीसारखे पार पोखरून टाकले आहे,  असे पंतप्रधानांनी स्वदेशाविषयी दोहा येथे सांगणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन करण्यासारखेच आहे. चार हिंदुस्थानी एकत्र आले की ते एकतर क्रिकेटवर बोलतात, सिनेमावर बोलतात नाहीतर भ्रष्टाचारावर बोलतात, अशी पुरवणी माहिती पंतप्रधानांनी परकीय भूमीवर दिली आहे. हिंदुस्थानात भ्रष्टाचार कसा होतो त्याचे गमतीदार किस्से सांगून पंतप्रधानांनी उपस्थितांच्या हशा व टाळ्या मिळवल्या, असा आरोप शिवसेनेने अग्रलेखातून केला आहे. आपल्या देशातील उणीवांवर परदेशी भूमीवर बोलण्याची गरज नाही. काही झाले तरी परकीय भूमीवर भारत एकसंध कुटुंबाप्रमाणेच दिसला पाहिजे, असा सल्लाही सेनेकडून मोदींना देण्यात आला आहे. याशिवाय, काळा पैसा भारतात परत आणण्याच्यासंदर्भात मोदी सरकारकडून वारंवार होणाऱ्या घोषणाबाजीवरही शिवसेनेने आसूड ओढले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जाऊन ‘आमच्याकडील काळ्या पैसेवाल्यांची यादी देता का?’ असे जाहीरपणे सांगणे म्हणजे देशाची बदनामीच ठरते. या गोष्टी गोपनीय पद्धतीनेच घडवून निकाल द्यायला हवा. मधुचंद्र शांततेत व्हावा, गाजावाजा बारशाला करावा. मधुचंद्राला प्रकाशाचा झगमगाट व बॅण्डबाजा लावला तर पाळणा हलणे कठीण होईल आणि बारसे अडचणीत येईल, असा खोचक टोला सेनेकडून भाजपला लगावण्यात आला आहे.