राष्ट्रीय शिक्षण धोरणात तरतूद

मुंबई : कायद्याच्या कक्षेत नसतानाही काही वर्षांपासून वाढीला लागलेली गृहशिक्षणाची संस्कृती आता विशेष मुले किंवा अपंग मुलांबाबत वैध ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना घरच्या घरीच शिकवण्यात यावे यासाठी पालकांना साहाय्य करण्याची तरतूद राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे.

शारीरिक, मानसिक अपंगत्व, अध्ययन अक्षम विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी त्यांना घरच्या घरी शिकवण्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नव्या शिक्षण धोरणात दिसत आहे. ‘गृहशिक्षण’ (होम स्कूलिंग) ही संकल्पना भारतात फोफावली असली तरी त्याला अद्याप कायदेशीर मान्यता नाही. मुलांनी शाळा किंवा औपचारिक शिक्षण व्यवस्थेतच सहभागी व्हावे अशी तरतूद शिक्षण हक्क कायद्यात करण्यात आली होती. या कायद्यातील तरतुदीनुसार गृहशिक्षण घेणारी मुले ही शाळाबाह्य़ ठरतात. मात्र, आता नव्या शिक्षण धोरणानुसार अपंग विद्यार्थी किंवा अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना घरी शिकवणे वैध ठरणार आहे.

संकेतभाषा अभ्यासक्रम

ऐकणे आणि बोलणे या क्रियांबाबत अक्षम व्यक्तींसाठी संकेत भाषा (साइन लँग्वेज) हे संवाद माध्यम असते. मात्र प्रत्येक स्थानिक भाषेतील अभ्यासक्रम, अनेक विषयांचा अभ्यासक्रम हा खुणांच्या भाषेत किंवा संकेत भाषेत उपलब्ध नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळाच्या माध्यमातून संकेत भाषेतून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.

मुक्त विद्यालयाचा पर्याय

अपंग विद्यार्थ्यांसाठी गृहशिक्षण अधिकृत शिक्षण माध्यम ठरवण्यात आले असले तरी इतर मुलांसाठी गृहशिक्षणाचा पर्याय असेल का याबाबत संदिग्धता आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलांना घरीच शिकवण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. अपंगत्व नसलेल्या मुलांच्या गृहशिक्षणाचा मुद्दा वादग्रस्तही ठरला आहे. या मुलांना घरीच शिकवण्याबाबत स्पष्टता नसली तरी मुक्त विद्यालयाची कक्षा वाढवण्याचे संकेत नव्या शिक्षण धोरणातून देण्यात आले आहेत. नियमित शाळेतील प्रस्तावित परीक्षा रचनेनुसार मुक्त विद्यालयाच्याही तिसरी, पाचवी, आठवी, दहावी, बारावी अशा टप्प्यांवर परीक्षा होतील. राष्ट्रीय किंवा राज्य मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून नियमित विषयांबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण विषयही अभ्यासता येतील.

धोरणाच्या मसुद्यात काय?

’ विशेष, अपंग मुलांना घरीच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालकांना साहाय्य.

’ तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे पालकांना प्रशिक्षण.

’ घरी शिकलेले विद्यार्थी आणि शाळेत शिकलेले विद्यार्थी समकक्ष असतील.

’ शिक्षणाची पद्धत, दर्जा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी, समानता या आधारे गृहशिक्षणाचे मूल्यांकन.

’ मूल्यांकनासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष निश्चित करणार.

’ गृहशिक्षणाबरोबरच शाळेतील शिक्षणाचा पर्यायही अपंग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

’ अपंग, विशेष विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य.