चार राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला असला तरी लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत तरी वेगळा मार्ग पत्करण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच पवार यांनी निधर्मवादाची कास कधी सोडलेली नसल्याने पक्षाच्या अन्य नेत्यांचे मत असले तरी उघडपणे भाजप-शिवसेना युतीबरोबर जाण्याचे राष्ट्रवादी टाळेल, अशीच चिन्हे आहेत.
दुबळ्या नेतृत्वावरून काँग्रेसवर टीका करतानाच जनतेला खंबीर नेतृत्व हवे आहे, असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सारेच पवार यांच्या निशाण्यावर होते. काँग्रेसचा पराभव दिसत असल्यास पवार काँग्रेसची साथ सोडतील, असा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो. पवार यांनी काँग्रेसची साथ सोडली तरी ते भाजपबरोबर उघडपणे जाण्याची शक्यता कमी आहे. राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी केली असली तरी पक्ष म्हणून उघडपणे भाजपबरोबर राष्ट्रवादी जाण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात भाजपचे सरकार असताना आपत्कालीन समितीचे अध्यक्षपद पवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. निधर्मवादावर ठाम राहताना जातीयवादी पक्षांबरोबर उघडपणे जाण्याचे पवार यांनी आतापर्यंत टाळले आहे. यावर त्यांचा कटाक्ष असतो. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करून पवार यांनी वेगळी चूल मांडली होती. तेव्हा राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपबरोबर जावे, असा दबाव पवार यांच्यावर पक्षातून होता. पण अगदी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली असली तरी पवार यांनी तेव्हा राज्यात सत्तेसाठी काँग्रेसला साथ दिली होती.
पक्षाच्या स्थापनेपासून सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रवादीच्या वतीने नेहमीच सांगण्यात येते. त्यातूनच राष्ट्रवादीबद्दल नेहमी उलटसुलट चर्चा सुरू होते. चार राज्यांचा निकाल काहीही लागला असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसबद्दल असलेल्या नाराजीचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. यातूनच काँग्रेसवर टीका करून मतदारांचा रोष कमी करण्याचा पवार यांचा प्रयत्न असू शकतो. शेतकरी, साखरपट्टा आदी आपले वर्चस्व असलेल्या भागातील मतदारांना खुश करून वर्चस्व कायम ठेवण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे.

विधानसभेच्या वेळी काय?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा साफ पाडाव झाल्यास विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादी कोणती भूमिका घेईल याबाबत विविध तर्क व्यक्त केले जातात. काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही तरी राष्ट्रवादी स्वबळावर लढेल का, ही चर्चा आहे. पण स्वबळावर लढण्याची ताकद आज घडीला राष्ट्रवादीकडे नाही. लोकसभेच्या निकालानंतरच पवार आपले पत्ते खुले करतील असेच चित्र आहे.