मुंबईत सत्तरीच्या दशकात जोरात चालणाऱ्या तस्करीला आळा बसला असला, तरी रविवारी तटरक्षक दलाच्या गस्त घालणाऱ्या नौकेने समुद्रात मुंबईपासून ३० किलोमीटर अंतरावर तस्करीची घटना उघडकीस आणली आहे. मुंबईच्या सागरी हद्दीबाहेर उभ्या असलेल्या जहाजांना काही वस्तू पुरवणाऱ्या दोन मच्छिमार बोटी आणि त्यांवरील माल तटरक्षक दलाच्या या कारवाईत ताब्यात घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बोटींवर आठ लोकांचा परवाना असताना २४ माणसे कोणत्याही ओळखपत्राविना प्रवास करताना आढळली. या बोटी आणि माणसे तटरक्षक दलाने ताब्यात घेतली असून माणसांना यल्लो गेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
तटरक्षक दलाचे सुभद्राकुमारी चौहान ही नौका रविवारी गस्त घालत असताना त्यांना दोन मच्छिमार नौका दिसल्या. ‘केजीएन’ आणि ‘सद्गुरुकृपा’ अशी या दोन बोटींची नावे असून मुंबईच्या किनाऱ्यापासून ३० किलोमीटर आत असलेल्या या दोन्ही बोटींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर कमाण्डण्ट बिभुती रंजन यांच्या आदेशानुसार या बोटींची झडती घेण्यात आली असता त्यात भारतीय बनावटीच्या विदेशी बॅण्डच्या दारुच्या १२ बाटल्या, अत्यंत उच्च दर्जाच्या सिगारेट्स, चुन्याची निवळी, तंबाखू आणि तत्सम वस्तू आढळल्या. विशेष म्हणजे या मच्छिमार बोटी असल्याने त्यांना बंदर सीमेबाहेर जाऊन अशा प्रकारे व्यवहार करण्याची कोणतीही परवानगीही नसते.