मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, राज यांचे सरकारविरोधातील घणाघाती भाषण आणि राज्यातील दुष्काळामुळे लोकांची अस्वस्थता लक्षात घेऊन राज यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाची खिल्ली उडवून प्रत्युत्तर देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने आखले आहे. त्याचाच भाग म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने राज यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राज यांना अंगावर घेतले म्हणजे लोकांचे लक्ष दुष्काळासह त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांपासून वळवता येईल, असा राष्ट्रवादीचा होरा आहे.
गेली वीस वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून राज्यावर सव्वा दोनलाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. सत्तर हजार कोटी रुपये खर्चूनही अवघा एक टक्का जमीन सिंचनाखाली आली, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे शेकडो कोटींचे घोटाळे, दुष्काळातही रष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या नातेवाईकांची श्रीमंत थाटात होणारे विवाह सोहळे यामुळे लोकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. नेमकी हीच वेळ साधून राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून दोघ्यांच्याही सभांना लाखोंची गर्दी जमत आहे. राज यांनी यापूर्वीही अजित पवार व आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार हल्ले केले आहेत. कोल्हापूर व  खेडच्या सभेत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नकला केल्या. ‘अजित पवार कायम गंभीर असतात कारण ते मोजण्यात मग्न असतात’ ही टीका खूपच बोचल्यामुळे मनसेचे दुष्काळी दौरे व सभा या भंपकपणा असल्याचा आरोप पवार यांनी केला. आमचेच दुष्काळाचे दौरे खरे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मुळात एवढी वर्षे सत्तेत असल्यानंतरही शेतकऱ्यांना आत्महत्या का कराव्या लागतात, पाण्यासाठी टँकर का लागतात, सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार कोणी केला आदी राज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तरे देण्याचे अजित पवार का टाळतात असा सवाल मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
‘नौटंकी पूरे झाली आता कामे करा’ हे खरे तर अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगायला हवे, त्याऐवजी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राज यांची खिल्ली उडवण्याचे उद्योग केले जात आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. बाळासाहेबांच्या सभांनाही गर्दी होत असे, मात्र मते मिळत नव्हती याची खोचकपणे आठवणही अजित पवार यांनी करून दिली होती. हासुद्धा लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांकडून विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका आ़ शिशिर शिंदे यांनी सांगितले.