राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

मुंबईत आणि मुंबईबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नेहमीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांच्या त्रासात आज भर पडली असून तासनतास त्यांनी वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत आहे.

ठाणे, दहिसर, वाशी टोलनाक्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावला असून पाच मिनिटांचे अंतर कापायला जवळपास एक तास लागत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेत असून याचा सर्वसामान्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहून अनेक लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी पोलीस गाड्या अडवून तपासणी सुरू आहे. त्यामुळे कोंडीत वाढत आहे.

मुंबईतही ईडीच्या कार्यालयाकडे जाणारे बसमार्ग पोलिसांनी बंद केले असून यामुळेही वाहतूक कोंडी झाली आहे. बॅलार्ड पियरकडे जाणारे बसमार्ग पोलिसांनी अवतारसिंग बेदि चौक येथे बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३, १०८ हे मिंट मार्गाने आरबीआय कडे सरळ वळवण्यात आले आहेत.

बस मार्ग क्रमांक ६६ हा भाटिया बाग येते खंडित करण्यात आला आहे. बस मार्ग क्रमांक १२२ स्वामी दयानंद सरस्वती चौक येथे खंडित करण्यात आला आहे.