महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोमवारी सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपला मतदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झटका दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध महापालिकांच्या १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सर्वाधिक सहा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. शिवसेना (४) तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागाजिंकल्या आहेत. नगरपालिका व नगरपंचायतींच्या एकूण १०८ जागांपैकी सर्वाधिक ३१ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या असून, भाजप (२६), शिवसेना (२०) तर काँग्रेसला १९ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी पुरस्कृत तीन तर आठ अपक्ष निवडून आले आहेत. विविध नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या. या निकालांवरून राष्ट्रवादीला मतदारांनी पसंती दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात टोलमाफी, एल.बी.टी. रद्द करणे, शेतीमालाचा हमीभाव वाढवून देणे यासारखी आश्वासने भाजपकडून देण्यात आली होती. पण यातील एकही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही, उलट नेमकी उलटी कृती भाजप सरकारकडून झाल्याच आरोप मलिक यांनी केला. खारघरच्या टोलचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता, असा युक्तिवाद बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील करतात. पण प्रत्यक्ष टोल वसुलीची अधिसूचना पाटील यांच्या खात्याने काढल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.
ठाण्यात सेना विजयी
ठाण्यातील वागळेतील किसननगर-पडवळनगर परिसरातून शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि त्यांची पत्नी जयश्री फाटक, तर सावरकरनगर परिसरातून शिवसेनेच्या कांचन चिंदरकर मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

महापालिका पोटनिवडणुकांमधील चित्र
ठाणे – एकूण जागा पाच – शिवसेना ३, राष्ट्रवादी २
पुणे – एकूण जागा दोन – दोन्ही जागा राष्ट्रवादी
कल्याण-डोंबिवली – एक जागा – काँग्रेस<br />उल्हासनगर – एक जागा – राष्ट्रवादी
पिंपरी-चिंचवड – एक जागा – राष्ट्रवादी.