28 September 2020

News Flash

पालिकेच्या ६६ शाळांनी कात टाकली

पालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पालिका शाळांना केलेली आकर्षक रंगसंगती आणि विशेष रचनेमुळे या शाळा लक्षवेधी ठरू लागल्या आहेत.

चार शाळांची पुर्नबांधणी, तर ६२ शाळांची दुरुस्ती ; गेल्या तीन वर्षांत ९६ कोटींचा खर्च

पालिका शाळा खासगी शाळांच्या तोडीस तोड दिसाव्यात, शाळेमध्ये आनंदी वातावरण असावे, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटावे हा दृष्टिकोन शाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्ती करण्याचा संकल्प पालिका प्रशासनाने सोडला आहे. आतापर्यंत चार शाळांची पुर्नबांधणी, तर ६२ शाळांची दुरुस्ती करण्यात आली असून आकर्षक रंगसंगती आणि विशेष रचना यामुळे या शाळा लक्षवेधी ठरू लागल्या आहेत.

पालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने त्यांना दप्तर, वह्य़ा, पुस्तके, कम्पास, गणवेश, बूट, रेनकोट आदी २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये पालिका शाळांमध्ये अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, शाळेत आनंदी वातावरण असावे, पालिका शाळा खासगी शाळांच्या तोडीच्या दिसाव्यात यादृष्टीने शाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले.

पालिकेने २०१७-१८ या वर्षांत पालिकेने ७२.४४ कोटी रुपये खर्च करून चार पालिका शाळांची पुर्नबांधणी केली. त्यात परळ भोईवाडा पालिका शाळा (१०.५५ कोटी रुपये खर्च), मालाड परिसरातील एमएचबी प्रवेशद्वार क्रमांक सात पालिका शाळा (२६.४६ कोटी रुपये), एमएचबी प्रवेशद्वार क्रमांक ८ पालिका शाळा (१२.३२ कोटी रुपये) आणि मानखुर्द येथील शिवाजी नगर क्रमांक ३ (चिखलवाडी) पालिका शाळा (२३.११ कोटी रुपये) या चार शाळांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांमध्ये ९६.२३ कोटी रुपये खर्च करून प्रशासनाने तब्बल ६२ पालिका शाळांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून रूप बदलण्यात आले आहे. या शाळांची रंगरंगोटी करताना पिवळ्या अथवा तपकिरी रंगाचा प्राधान्याने वापर करण्यात आला असून, त्यामुळे पालिका शाळांची स्वतंत्र आणि आकर्षक ओळख तयार झाली आहे. त्यामुळे शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले.

शाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्ती करताना ‘शिक्षण हक्क कायद्या’तील विविध तरतुदींची अंमलबजावणी करण्याची काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालये ४० विद्यार्थ्यांसाठी एक शौचालय, गरजेनुसार अतिरिक्त वर्गखोल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आणि अन्य सुविधा आदी बाबींचा त्यात समावेश आहे, असे आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले. पुर्नबांधणी आणि दुरुस्तीमुळे नवे रूप प्राप्त झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांना ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास आबासाहेब जऱ्हाड यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 4:57 am

Web Title: new look mumbai bmc schools
Next Stories
1 आठवडाभराच्या विश्रांतीनंतर व्याघ्र सफारीत ‘यश’चे पुनरागमन
2 हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेणार?
3 ‘मुंबईचा राजा’चा मान यंदा कोणाचा?
Just Now!
X