कोणत्याही नवीन प्रकारच्या गाडय़ा उपनगरीय भागात आल्या की, त्या प्रवाशांसाठी चालू करण्याआधी त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात. गाडी मुंबईत दाखल होऊन दीडदीड वर्षे उलटतात, तरी या चाचण्या चालूच असतात. अशा कोणत्या चाचण्या घेतल्या जातात, त्यांचे महत्त्व काय.. जाणून घेऊ या!

‘नव्या बंबार्डिअर गाडय़ांमध्ये वाळूच्या गोणी भरून गाडी खराब!’ दीड वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात या मथळ्याखाली एक वृत्त छापून आले होते. सोबत नव्याकोऱ्या गाडीत खच्चून भरलेल्या वाळूच्या आणि मातीच्या गोणी दिसत होत्या. बातमीदाराने अशा प्रकारे नवीन गाडी खराब का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. अधिक खोलात न शिरता दिलेल्या त्या बातमीवर रेल्वे अधिकारी फक्त हसले होते. नव्याने दाखल झालेल्या गाडीची चाचणी घेण्याचाच तो एक प्रकार होता.

mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
navi mumbai marathi news, navi mumbai cctv camera marathi news
नवी मुंबई: निम्मे शहर सीसीटीव्ही कक्षेबाहेरच, आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीतही काम अपूर्णच
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

सध्या वातानुकूलित गाडी आणि तिच्या चाचण्या हा मुंबईकर प्रवाशांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कुर्ला कारशेडमध्ये येऊन पडदानशीन झालेल्या या वातानुकूलित लोकलचे प्रथम दर्शनच मुंबईकरांना प्रेमात पाडणारे होते. मोठमोठय़ा खिडक्या, एकमेकांना जोडलेले आणि एका डब्यातून दुसऱ्या डब्यात आतूनच जाता येईल असे डबे, आपोआप बंद होणारे दरवाजे या सगळ्या वैशिष्टय़ांनिशी सज्ज असलेली ही गाडी प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार याची उत्सुकता तमाम मुंबईकरांना लागली आहे; पण या गाडीच्या चाचण्या घेणे अजूनही बाकी असल्याने पुढील सहा महिने ही गाडी मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता धूसर आहे. सहा महिने चालणाऱ्या या चाचण्या नेमक्या कोणत्या, असा प्रश्न कोणत्याही मुंबईकर प्रवाशाला पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर खूप रंजक आहे.

उपनगरीय रेल्वेमार्गावरच नाही, तर भारतीय रेल्वेवर दाखल होणाऱ्या प्रत्येक नव्या गाडीची किंवा नव्या बनावटीच्या गाडीची कसून तपासणी केली जाते. ती गाडी भारतातील रेल्वेरुळांवर धावू शकते का, त्या गाडीच्या तंत्रज्ञानात काही दोष नाही ना, गाडी प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित आहे ना, या सर्व गोष्टी तपासून घेण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या उपनगरीय मार्गावर दाखल झालेल्या सिमेन्स बनावटीच्या गाडय़ांची चाचणीही अशाच प्रकारे घेतली गेली होती, तर दीड वर्षांपूर्वीची बंबार्डिअर गाडय़ांची चाचणीही अनेक मुंबईकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिली होती.

या चाचण्यांचे दोन प्रकार आहेत. स्टॅटिक आणि डायनॅमिक! या प्रत्येक प्रकारात तब्बल १८ प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. म्हणजे कोणतीही गाडी सेवेत येण्याआधी ३६ प्रकारच्या चाचण्यांना तिला सामोरे जावे लागते. आता स्टॅटिक चाचण्या म्हणजे काय, ते एकदा पाहू या!

गाडी कारशेडमध्ये असताना गाडीच्या अनेक अंतर्गत भागांची चाचणी घ्यावी लागते. प्रत्यक्ष रेल्वेरुळांवर धावताना या प्रणालीत असलेल्या दोषांमुळे ही गाडी बंद पडू नये, हा या चाचण्यांमागचा कटाक्ष असतो. कारशेडमध्ये घेतल्या जाणाऱ्या या चाचण्यांना स्टॅटिक ट्रायल म्हणतात. या १८ चाचण्या घेण्यासाठी तब्बल तीन ते चार आठवडय़ांचा म्हणजेच महिन्याभराचा कालावधी लागतो. डायनॅमिक ट्रायलच्या तुलनेत या चाचण्या लवकर होतात. प्रत्येक गाडीमध्ये विद्युतप्रणाली, काही समान कंट्रोल्स असतात. ही विद्युतप्रणाली योग्य पद्धतीने काम करते का, मोटरमन आणि गार्ड यांच्याकडे असलेले कंट्रोल पॅनल अचूक आहे का, गाडीतील उद्घोषणा यंत्रणा चालते का, सॉफ्टवेअरद्वारे गाडीला दिलेल्या कमांड्स योग्य पद्धतीने पाळल्या जातात का, अशा अनेक गोष्टींची चाचणी या स्टॅटिक ट्रायलदरम्यान होते. यात ब्रेकप्रणाली हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही गाडीचा अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या ब्रेकप्रणालीची चाचणी कारशेडमधल्या ७०० ते ८०० मीटरच्या पट्टय़ात केली जाते.

वातानुकूलित गाडीच्या चाचण्या करताना या स्टॅटिक ट्रायलदरम्यान आणखी दोन गोष्टींच्या चाचण्यांची भर पडते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे वातानुकूलन यंत्रणा! गाडी चालू झाल्यानंतर ही वातानुकूलन यंत्रणा व्यवस्थित चालते की नाही, हे या चाचणीदरम्यान विविध कसोटय़ांवर तपासून बघितले जाते. त्याशिवाय दुसरी यंत्रणा म्हणजे स्वयंचलित दरवाजे! मेट्रोमध्ये हे दरवाजे उघड-बंद होण्याची वेळ निश्चित आहे. नव्या वातानुकूलित गाडीतही ही वेळ निश्चितच ठेवली जाणार आहे; पण त्या ठरावीक वेळेत हे दरवाजे व्यवस्थित उघड-बंद करतात का, हे या चाचणीदरम्यान तपासून घेतले जाते. त्यात काही दोष आढळल्यास तातडीने संबंधित कंपनीच्या निदर्शनास आणून दिला जातो. सुदैवाने सध्या तरी वातानुकूलित गाडीच्या स्टॅटिक ट्रायलमध्ये कोणताही दोष आढळल्याचे अधिकृत वृत्त मध्य रेल्वेकडून मिळालेले नाही.

स्टॅटिक ट्रायलमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर गाडीची डायनॅमिक किंवा धावती चाचणी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याची गरज असते. डायनॅमिक ट्रायल प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर घ्यायची असल्याने ती रात्रीच्या वेळी उपनगरीय वाहतूक बंद झाल्यानंतरच घ्यावी लागते. त्यासाठी मध्य रेल्वेचा परिचालन, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, अभियांत्रिकी आणि तांत्रिक असे चार विभाग एकत्रितपणे निर्णय घेऊन वेळा ठरवतात. स्टॅटिक ट्रायलप्रमाणेच डायनॅमिक ट्रायलमध्येही १८ विविध यंत्रणांची तपासणी होत असली, तरी हे वेळापत्रक तयार करण्यात येणाऱ्या विविध अडचणींमुळे डायनॅमिक ट्रायलसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच ही ट्रायल पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गावर घेतली जाते.

ही ट्रायल घेताना त्यात गाडीच्या दोन डब्यांना जोडणारे कपलिंग, गाडीची ब्रेक यंत्रणा, ओव्हरेड वायर आणि पेण्टोग्राफ, गाडीचा वेग, आणीबाणीच्या काळात ब्रेक लावल्यावर गाडी किती पुढे जाते आदी सर्व गोष्टी तपासून बघितल्या जातात. त्यासाठी आरडीएसओ आणि रेल्वे या दोन्ही यंत्रणांचे अधिकारी गाडीच्या एका डब्यात विविध यंत्रे, संगणक आदी गोष्टी घेऊन बसलेले असतात. गाडीच्या डब्यांच्या टोकांना आणि डब्याच्या कोपऱ्याला सेन्सर लावलेले असतात. गाडी ठरावीक सेक्शनमध्ये ठरावीक वेगात धावत असताना काही हादरे जाणवतात का, ब्रेक लावताना गाडीला काही वेगळा झटका बसतो का, इमर्जन्सी ब्रेकप्रणाली अमलात आणली, तर आतील प्रवाशांना काय झटका बसेल आदी गोष्टी या संगणकाद्वारे प्रत्यक्ष तपासल्या जातात.

या सर्व चाचण्या तुलनेने रिकाम्या गाडीतच घेतल्या जातात; पण गाडी धावताना, गाडीत हजारो प्रवासी असताना गाडी कशी धावेल, तिच्या सर्व प्रणाली कशा काम करतील, हे सांगणे कठीण असते. त्यासाठी मग प्रत्येक डब्यातील प्रवासी क्षमतेच्या वजनाचा विचार करून सर्व डब्यांमध्ये वाळूची पोती भरली जातात. प्रत्यक्ष प्रवाशांसह या चाचण्या करणे धोकादायक असल्याने रेल्वेकडून हा उपाय अवलंबला जातो. वाळूची पोती घेऊन ही गाडी धावते. रिकाम्या गाडीसह झालेल्या सर्व चाचण्या वाळूच्या गोणींनी भरलेल्या गाडीसह पुन्हा केल्या जातात. या सर्व चाचण्यांमधून तावून सुलाखून निघालेली गाडी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ बनू शकत नाही, हे विशेष!

email – tohan.tillu@expressindia.com

@rohantillu