गणेशभक्तांसाठी पश्चिम व मध्य रेल्वेवर प्रत्येकी आठ विशेष गाडय़ा

मुंबईतील गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या रात्री प्रत्येकी आठ विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा चर्चगेट-विरार आणि सीएसटी-कल्याण व सीएसटी-पनवेल यांदरम्यान चालवण्यात येणार आहेत. गणेशभक्तांनी अधिकृत तिकीट काढून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेवर सीएसटीहून रात्री १.३० वाजता कल्याणसाठी आणि रात्री २.३० वाजता ठाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येईल. या गाडय़ा अनुक्रमे ३.०० आणि ३.३० वाजता पोहोचतील. कल्याणहून रात्री १.०० वाजता आणि ठाण्याहून रात्री २.०० वाजता सीएसटीसाठी गाडय़ा सोडल्या जातील.

हार्बर मार्गावर सीएसटीहून पनवेलसाठी रात्री १.३० वाजता आणि २.४५ वाजता विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

या गाडय़ा पनवेलला २.५० आणि ४.५० वाजता पोहोचतील. तर पनवेलहून रात्री १.०० आणि १.४५ वाजता सीएसटीकडे विशेष गाडय़ा रवाना होतील. या गाडय़ा २.२० वाजता आणि ३.०५ वाजता सीएसटीला पोहोचतील. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार यांदरम्यानही आठ सेवा चालवल्या जाणार आहेत. यात चर्चगेटहून विरारकडे १.१५, १.५५, २.२५ आणि ३.३० वाजता चार विशेष गाडय़ा चालवल्या जातील. तर विरारहून चर्चगेटकडे १२.१५, १२.४५, १.४० आणि २.५५ वाजता गाडय़ा सुटतील.