गुजराती समाजाबद्दल नितेश राणे यांनी व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक असून त्याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे.
काँग्रेसने कोणत्याही समाजाचा तिरस्कार केलेला नाही वा समाजाबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्याचे टाळले आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधून नितेश राणे यांना टोला हाणला. यापूर्वीही नितेश राणे यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल ठाकरे यांनी नापसंती व्यक्त केली होती. उद्योगमंत्री राणे यांनी नितेशचे समर्थन करणारे वक्तव्य केले असले तरी याबाबत त्यांच्यांशी चर्चा करून मत जाणून घेतले जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले. नारायण राणे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची मुले त्यांना अडचणीत आणतात, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
मतांसाठी भाजपचे राजकारण – नारायण राणे
मुंबई आणि महाराष्ट्राच्या भरभराटीत गुजरातींचे योगदान आहेच. आपलेही त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मात्र गुजराती मतदार आपलाच आहे, असे समजून भाजपाने नितेश यांच्या ‘ट्विट’चे ‘ट्विस्ट’ करीत राजकारण सुरू केले आहे. विधिमंडळातील अपयशामुळेच भाजपाने हा उद्योग सुरू केल्याचा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केला.