गणेशोत्सवकाळात मुंबई-गोवा मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुंबई- कोल्हापूर मार्गाने जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची गृहमंत्री आर.आर. पाटील यांची घोषणा सरकारने टोल कंपन्यांसमोर गुडघे टेकल्याने हवेतच विरली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास किंवा टोलचा भरुदड सहन करावा लागणार आहे.
चाकरमान्यांनी कोल्हापूरमार्गे कोकणात जावे, असे आवाहन सरकारने मागील यंदाही केले आहे. गेल्या वर्षी २५ हजार वाहने याच मार्गाने कोकणात गेली होती. यंदाही याच मार्गाने वाहतूक वळविण्याचा गृहविभागाचा प्रयत्न असून त्यासाठी टोलमधून सवलत देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती. टोल सवलतीचा हा मुद्दा पाटील यांनी मंत्रिमंडळात उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही जबाबदारी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांच्याकडे सोपविली होती. मात्र बाँठिया यांनी घेतलेल्या बैठकीत टोल कंपन्या व सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रस्तावाला विरोध केला. एकदा अशी सवलत दिल्यास अन्य सणांनाही तशी प्रथा पडेल आणि त्याचा आर्थिक भार सरकारवरच पडेल ही बाब लक्षात आल्यानंतर सरकारने टोलमाफीचा नाद सोडून दिला. गृहमंत्र्यांना याबाबत विचारले असता,  टोलमाफी  मिळावी अशी आपली भूमिका असली तरी आपण अर्थमंत्री नाही असे सांगत त्यांनी घूमजाव केले.