कसारा आणि जव्हार तालुक्यांना जोडणाऱ्या वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने यंदाही मध्य वैतरणा धरणातील ४५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या दोन तालुक्यांचा संपर्कच तुटणार असल्याने हा पुल तातडीने तयार होणे आवश्यक आहे.
मध्य वैतरणा धरणाचे बांधकाम गेल्या वर्षी पूर्ण झाले. त्यातून ४५० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवर पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण केलेल नाही. त्यामुळे गेल्या वर्षी धरणात पाणी साठवता आले नाही. सध्याच्या जुन्या पुलामुळे कसारा आणि जव्हार जोडले गेले आहेत. मात्र हा पूल धरणात पाणी साठविल्यानंतर पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे विहीगाव येथे अधिक उंचीवर दुसरा पूल बांधण्यात येत आहे. १५० फूट उंचीवर हा पूल बांधला जात असून त्याची लांबी ३५० मीटर आहे. या कामाला पैसे कमी पडल्याने पालिकेने निधीची रसदही पुरविली होती. मात्र तरीही हा पूल अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. हा पूल पूर्ण झाला नाही आणि मुसळधार पाऊस पडला तर धरणाचे दरवाजे उघडेच ठेवावे लागणार आहेत. मात्र धरणातील पाणी सोडून देण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याचा लोंढा एकदम आल्यास नदीकाठच्या गावांनाही फटका बसू शकतो.
नव्या पुलाच्या बांधणीचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम मेच्या सुरुवातीला पूर्ण झाले असते तर त्याची चाचणी घेता आली असती. मात्र कामाची गती पाहता मेअखेर हा पूल पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे.