कुर्ला पश्चिम परिसरात जलवाहिनीवर १२०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १९ आणि २० ऑक्टोबर रोजी या परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून कळविण्यात आले आहे.
कुर्ला पश्चिम परिसरातील जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून ते २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पूर्ण होईल असा जल विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात काजूपाडा पाईपलाईन, गुरुनानक नगर, एल. बी. एस. मार्ग (महिंद्र पार्क ते महाराष्ट्र काटा), कुर्ला स्थानक, तकीयावाड, पाईप रोड, हॉल रोड, न्यू मिल रोड, ब्राह्मणवाडी, कमानी, ख्रिश्चन गाव, स्वदेशी मिल मार्ग, कसाईवाडा, कोहिनूर आदी भागामध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरातील रहिवाशांनी १८ ऑक्टोबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.