या वर्षी जरा जास्तच उकडतंय.. असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदी खरं आहे. दरवर्षीच हे वाक्य सहज उच्चारले जात असले तरी या वेळी ऑक्टोबरमधील ‘ताप’दायक दिवस अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. गेल्या दहा वर्षांत २००८ मध्ये एकदा तर २०१४ मध्ये तीन वेळा तापमान ३७ अंश व त्यापेक्षा अधिक होते. मात्र महिना संपायला नऊ दिवस बाकी असतानाही या ऑक्टोबरमधील ३७ अंश से.वरील दिवसांची संख्या आठवर पोहोचली आहे.
पाऊस माघारी फिरला आणि ऋतुबदलाच्या काळात वाऱ्यांनी दिशा फिरवली की साधारण ऑक्टोबरमध्ये तापमान वाढायला सुरुवात होते. नोव्हेंबरच्या मध्यावर उत्तरेकडील थंड वारे राज्यापर्यंत पोहोचेपर्यंत हवा गरम राहते. ‘ऑक्टोबर हीट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तप्त दिवसांचा अनुभव प्रत्येक जण दरवर्षी घेतो. मात्र गेल्या दहा वर्षांत ‘ऑक्टोबर हीट’ची पातळी वाढत असल्याचे मुंबई हवामानशास्त्र विभागाने केलेल्या नोंदीवरून ठळकपणे दिसते. विशेषत: २०१० पासूनच्या ऑक्टोबरमध्ये उकाडा तीव्र होत आहे. २०१० पासून मान्सून साधारणत: ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यातून परतल्याने पावसाचा व तापमानाचा थेट संबंध दिसून येत नाही. मुंबईत साधारणत: ३५ अंश से.पर्यंतचे तापमान सामान्य समजले जाते.
ऑक्टोबरमध्ये हवा कोरडी होते व तापमान ३५ अंश से.ची पातळी ओलांडते. ही पातळी ओलांडली गेली की ‘ऑक्टोबर हीट’ अनुभवायला मिळते. २०१० मध्ये पाच दिवस, २०११ मध्ये ७ दिवस, २०१२ मध्ये १२ दिवस, २०१३ मध्ये ४ दिवस, २०१४ मध्ये ८ दिवस तर २२ ऑक्टोपर्यंत या वर्षी एक दिवस तापमान ३५ ते ३६ अंश. से. दरम्यान राहिले. ऑक्टोबरच्या वैशिष्टय़ाबरहुकूमच हे दिवस होते. मात्र तापदिवसांची खरी कमाल यापुढे आहे. गेल्या दहा वर्षांत केवळ ऑक्टोबरमध्ये १२ वेळा तापमान ३७ अंश से.वर गेले होते आणि त्यातील आठ दिवस हे सध्या सुरू असलेल्या महिन्यातील आहेत! गेला आठवडाभर तापमान ३७ अंश से.हून अधिक आहे. वातावरणात प्रतिचक्रीवातसदृश (चक्रीवादळाच्या विरुद्ध) स्थिती आहे. या स्थितीत केंद्रापासून वारे बाहेर ढकलले जातात. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे मुंबईत येण्यापासून रोखले जात आहेत. त्याच वेळी साधारण दुपारी पश्चिमेकडून येणारे दमट वारेही मंदावले आहेत. त्यातच अल्निनोच्या प्रभावाने समुद्रावरील वाऱ्यांचे तापमानही वाढले आहे. या सर्व स्थितीमुळे ऑक्टोबरमधील उष्ण दिवसांचा कालावधी लांबला आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.
ऑक्टोबरमध्ये तापमान का वाढते?
ऋतू बदलाचा हा काळ असतो. या काळात वाऱ्यांची दिशा बदलते. समुद्रावरून येणाऱ्या दमट व तुलनेने थंड वाऱ्यांपेक्षा जमिनीवरील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढतो. वाऱ्यांचा वेगही मंदावतो.
या वर्षी तापमानवाढीचे कारण
प्रतिचक्रीवात स्थितीमुळे उत्तरेतील थंड वारे रोखले गेले. अल् निनो प्रभावामुळे समुद्रावरून येणारे वारेही तुलनेने गरम आहेत. चक्रीवात स्थिती राहिल्याने उष्ण दिवसांचा काळ लांबला.

वर्ष/तापमान            ३५ पेक्षा कमी       ३५-३६ ३६-३७   ३७ पेक्षा जास्त
२०१५ (आजपर्यंत)         ११                       १       २           ८
२०१४                               १५                    ८         ५          ३
२०१३                              २६                     ४         १          ०
२०१२                             १९                    १२          ०        ०
२०११                             २०                    ७           ४          ०
२०१०                           २५                     ५             १        ०