गेल्या जून महिन्यात मंत्रालयाला लागलेल्या आगाती जळालेल्या एकूण ६३,३४९ पैकी जेमतेम ६३३९ म्हणजेच १० टक्के फायलीच आतापर्यंत पुन्हा तयार करण्यात आल्या आहेत. या आगीत सामान्य प्रशासन, गृह, महसूल उद्योग आणि ऊर्जा खात्यांच्या सर्वाधिक फायली जळाल्या आहेत.
मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेल्या फायली लवकरच पुन्हा नव्याने तयार केल्या जातील, असे आश्वासन शासनाच्या वतीने पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात देण्यात आले होते. पण नव्याने तयार झालेल्यांपैकी फाईली या बदल्या, बढत्या किंवा शासनाच्या कामकाजावर परिणाम होणार नाहीत अशाच असल्याचे समजते.  मंत्रालयात प्रत्यक्ष कामापेक्षा बदल्या, बढत्या आणि इतरच फायलींची संख्या जास्त असते, असे नेहमीच सांगण्यात येते. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये शासनाच्या वतीने किती फायली जळाल्या आणि किती आतापर्यंत पुन्हा तयार झाल्या याची आकडेवारी देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या १९,७१९ फाईली जळाल्या असून, आतापर्यंत ७१७ पुन्हा तयार झाल्या आहेत. गृह विभागाच्या ११ हजारपेक्षा जास्त फायलींचे नुकसान झाले असले तरी अद्याप त्यातील एकही फाईल पुन्हा तयार झालेली नाही. गृह विभागात जास्त फाईली या बदल्यांच्याच असतात. महसूल खात्याच्या ५८०० फायली जळाल्या असल्या तरी महसूल खात्याच्या बहुतांशी महत्त्वाच्या फायलींचे डिजीटाईझेशन झालेले असल्याने महसूल विभागाचे फारसे नुकसान होणार नाही.
गृह, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, मदत व पुनर्वसन या खात्यांची एकही फाईल पुन्हा तयार झालेली नाही. महत्त्वाच्या फाईली तयार करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.