09 March 2021

News Flash

भरधाव गाडी चालविणाऱ्या तरुणाने महिलेला उडवले

मालाडमधील दुर्घटनेत महिला जागीच ठार * पार्टीहून परतत असताना घडलेला प्रकार मालाडमध्ये पार्टीहून परतणाऱ्या एका १७ वर्षांच्या तरुणाने रविवारी पहाटे एका महिलेला उडवले. ही महिला जागीच ठार

| December 25, 2012 04:57 am

* मालाडमधील दुर्घटनेत महिला जागीच ठार
* पार्टीहून परतत असताना घडलेला प्रकार

मालाडमध्ये पार्टीहून परतणाऱ्या एका १७ वर्षांच्या तरुणाने रविवारी पहाटे एका महिलेला उडवले. ही महिला जागीच ठार झाली. त्याचबरोबर गाडी मागे वळवताना त्याने एका गाडीला दिलेल्या धडकेत त्या गाडीतील एका महिलेला दुखापत झाली. घटनास्थळावरून पळून गेलेल्या या तरुणाला अखेर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील गुडीया पाडा येथे रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
मालाडच्या ओर्लेम चर्च येथे राहणारा मोहित शाह (नाव बदलले आहे) हा तरुण शनिवारी मढ आयलण्ड येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. पहाटे तो तेथून आपल्या स्कोडा गाडीने (क्रमांक एमएच ०२ बीजी ६४६२) परतत होता. लिंक रोडच्या गुडीया पाडा येथे त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या अनिता चौहान (४५) या सफाई कामगार महिलेला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, चौहान या त्या गाडीबरोबर सुमारे दहा फूट फरफटत जाऊन एका झाडावर आदळल्या. गाडी आणि झाड यांच्यामध्ये अडकलेल्या चौहान यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात मोहितने गाडी प्रचंड वेगाने मागे वळवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने जवळच उभ्या असलेल्या आय टेन या गाडीलाही जोरदार धडक दिली. या गाडीत बसलेल्या एका महिलेच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र या महिलेनेच मोहितच्या गाडीचा नंबर टिपून ठेवला.
या घटनेनंतर प्रक्षुब्ध जमावाने रस्त्यावर जमून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. स्कोडा गाडी चालवणारा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्या गाडीचा वेग ताशी ७० किमी. होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आय टेन गाडीतील महिलेने टिपलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे बांगूरनगर पोलिसांनी मोहितला त्याच्या राहत्या घरातून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ बागल यांनी दिली. मोहितला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनिता चौहान मालवणी येथे पती आणि चार मुलांसह राहत होत्या. त्यांचे पतीही सफाई कामगार असून, त्यांच्या मोठय़ा मुलीचे लग्न झाले आहे. इतर तीन मुले शिक्षण घेत आहेत. अपघाताच्या वेळी त्या या भागातील इमारतींमधील कचरा उचलण्यासाठी जात होत्या.    
वाहन परवान्याविना भरधाव
अपघातातील आरोपी मोहित शहा हा श्रीमंत घरातला मुलगा होता. तसेच चारचाकी वाहनाचा परवाना मिळवण्यासाठी वयाची अट १८ वर्षांची असताना १७ वर्षीय मोहित मात्र वाहन परवान्याशिवाय गाडी चालवत होता. मोहितच्या वडिलांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असून, त्याचे काका गोरेगावातील एका मोठय़ा क्लबचे विश्वस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:57 am

Web Title: one men smashed the women with high speed car
टॅग : Car
Next Stories
1 मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांमध्ये जनतेच्या पैशांचा अपव्यय!
2 एमएमआरडीएच्या ‘मनमानी’ला विरोधकांचेही अभय
3 अपुरी माहिती देणाऱ्या चिटणीस विभागाला पालिका उपायुक्तांच्या कानपिचक्या
Just Now!
X