अतिउत्साही तरूणांच्या जीवघेण्या कसरतींमुळे चर्चेत आलेल्या हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी दुपारी आणखी एकाचा बळी गेला. गाडीच्या टपावरून प्रवास करणारा समशेर आलम (१९) हा तरूण ओव्हरहेड वायर आणि पेंटोग्राफला चिकटून मृत्यूमुखी पडला. गेल्या तीन दिवसांत रेल्वेमार्गावर ३० अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे.
पनवेलहून मुंबईला जाणाऱ्या गाडीच्या टपावरून समशेर प्रवास करीत होता. टिळकनगर स्थानकात दुपारी पावणे तीनच्या सुमारास ओव्हरहेड वायर आणि पेंटोग्राफ यांना समशेर चिकटला व जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे ही गाडी स्थानकात थांबवावी लागली व वाहतूक पाऊण तास विस्कळीत झाली. दोन आठवडय़ांपूर्वी एक तरूण हात सटकून खाली पडला होता. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल करत असलेल्या योजना कूचकामी ठरत आहेत. ८ ऑगस्ट रोजी १२ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. ९ ऑगस्ट रोजी ८ जण ठार झाले, तर शनिवारी ९ जण रेल्वेमार्गावरील अपघातांत मृत्युमूखी पडले आहेत.